‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत महाराष्ट्रात दुसरा आलेल्या चेतन आगे याच्या भावना
कालपर्यंत मला कोणी ओळखत नव्हते. आज साऱ्या महाराष्ट्राभर माझे नाव झाले ते केवळ ‘लोकसत्ता’मुळे, अशा भावना ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत महाराष्ट्रात दुसरा आलेल्या चेतन आगे याने व्यक्त केल्या. तो श्रीमती बिंझाणी नगर महाविद्यालयाचा पदव्युत्तर राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. आज त्याच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एम.एम. नियाझी यांच्या हस्ते ५ हजार रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देत त्याचा सत्कार करण्यात आला.
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणावर आधारित ‘हुतात्मा मारुती कांबळे’ या अग्रलेखाचा विषय ब्लॉग लिहिण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. त्यात शीव येथील एसआयईएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी शालिनी शिरसाट प्रथम, तर चेतन आगे याचा दुसरा क्रमांक आला. नागपूर ‘लोकसत्ता’ची चमू चेतनच्या सत्कारासाठी महाविद्यालयात पोहोचली तेव्हा तुम्हाला वारंवार महाविद्यालयात यावे लागेल, असा आत्मविश्वास व्यक्त करून लोकसत्ताने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाबद्दल त्याने आभार मानले. डॉ. नियाझी म्हणाल्या, संगणकावर लिहिणे हे आव्हान आहे. शिवाय, या स्पर्धेत वाचन, संशोधन आणि सादरीकरणही असल्याने विद्यार्थ्यांचा कस लागतो. रोहित वेमुला राजकीय विषय असल्याने या ज्वलंत विषयावर लोकसत्ताने विद्यार्थ्यांना लिहिते केले आणि आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांला महाराष्ट्रात नावलौकिक मिळाला, असेही त्या म्हणाल्या.
राज्यशास्त्राच्या विभाग प्रमुख डॉ. अलका देशमुख म्हणाल्या, आम्ही आतापर्यंत संशोधक, प्राध्यापक तयार केले, पण लेखक नाही. आमच्या महाविद्यालयातून तरुण लेखक म्हणून चेतनला पुढे आणण्यात ‘लोकसत्ता’ने सहकार्य केले. चेतनचे ‘मेंटॉर’ प्रा. नरेंद्र घरत यांनी संचालन केले. चेतनला संदीप तुंडुलवार आणि निलेश फटिंग या प्राध्यापकांनी ‘ब्लॉग बेंचर्स’साठी गरजेनुसार मदत केली.