गुन्हेगारांशी संबंध असणाऱ्यांचे निलंबन; सट्टा प्रकरणातील आरोपी शिपायाला अभय

कुख्यात गुंडांसोबत असलेल्या संबंधांवरून स्वच्छ प्रतिमेचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आठ पोलीस शिपायांना निलंबित केले. मात्र, क्रिकेट सट्टयाचा सूत्रधार व गुन्हा दाखल झालेला शिपाई रतन उंबरकर याच्यावर अद्याप शहर पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उंबरकरला आशीर्वाद कोणाचा? असा सवाल आता पोलीस दलातील सहकारी कर्मचारीच विचारत आहेत.

सातनवरी शिवारातील फार्महाऊसवर क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर १४ ऑगस्ट २०१७ ला कोंढाळी पोलिसांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी विलास भीमराव मनघटे, दीपक शंकर गोस्वामी, शेख अब्बास शेख हमीद आणि यश कन्हैयालाल अरोरा हे आरोपी तामिळनाडू प्रिमियर लिगवर खायवाडी-लगवाडी करीत असल्याचे मिळाले.

त्यांच्याकडून १४ मोबाईल, २ लॅपटॉप आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ९ लाख २३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. ते फार्महाऊस सुरेश कटामले रा. वाडी याने आरोपींना उपलब्ध करून दिले होते. त्यात कुख्यात क्रिकेट बुकी दीपेन भेदा, शेख फिरोज यांच्यासह रतन उंबरकर या पोलीस हवालदाराला आरोपी करण्यात आले. त्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली.

या क्रिकेट सट्टयाचा मुख्य सूत्रधार उंबरकर हाच होता, हे तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी तो नागरी हक्क संरक्षण शाखेत (पीसीआर) प्रतिनियुक्तीवर कार्यरत होता. त्यानंतर पीसीआरचे पोलीस महानिरीक्षक कैसर खलीद यांनी त्याच्यावर कारवाई करून ५ ऑक्टोबर २०१७ ला त्याची रवानगी नागपूर शहर पोलीस दलात केली.

उंबरकरची मूळ नियुक्त शहर पोलीस दलात असल्याने त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे अधिकारही शहर पोलिसांना आहेत. मात्र, तेव्हापासून शहर पोलिसांनी त्याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या तो     मुख्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे कुख्यात गुंडांना कारागृहातून ने-आण करताना मदत करणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होते. मात्र, गुन्हयात मुख्य आरोपी असलेल्या शिपायाला अभय कुणाचे आहे, असा सवाल निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्त अशा आरोपी पोलीस शिपायावर कारवाई करतील का, असा सवाल पोलीस दलातील कर्मचारीच उपस्थित करीत आहेत.

चौकशी करून कारवाई

या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. अशाप्रकारचा कर्मचारी प्रतिनियुक्तीवरून नागपूर शहर पोलीस दलात परतला असेल, तर त्याची माहिती घेऊन कारवाई करू.  – शिवाजी बोडखे, सहपोलीस आयुक्त.