चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात गुरुवारी संध्याकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली.

मंजुळा रामदिनेश मिश्रा (३६) रा. संजयनगर झोपडपट्टी, पांढराबोडी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामदिनेश रामलक्ष्मण मिश्रा (४५) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील रिवा जिल्हयातील रहिवासी आहेत. अनेक वर्षांपूर्वी तो कामाच्या शोधात आपल्या कुटुंबासह नागपुरात आला. तेव्हापासून पांढराबोडी परिसरात राहतो. परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी तो कॅटरिंगमध्ये स्वयंपाकाचे काम करायचा. त्यांना एक पंधरा वर्षांची प्राची नावाची गतिमंद मुलगी आहे.  पाच वर्षांपासून तो अंकित यादव यांच्या घरी पहिल्या माळ्यावर भाडय़ाने राहायचा. त्याच्या शेजारी दुसरा भाडेकरूही होता.  गेल्या वर्षांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. गुरुवारी  संध्याकाळी पत्नीच्या चारित्र्यावरून वाद झाला.  त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीवर वार केले. ती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली. त्यानंतर त्याने तिचा गळा चिरला व स्वत:च पत्नीला संपवल्याचे सांगत पहिल्या माळयावरून खाली उतरला व पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला. त्यावेळी मुलगी शेजाऱ्यांच्या घरी होती. शेजाऱ्याने ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटणकर व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिमंडळ-२ चे उपायुक्त राकेश ओला, अंबाझरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र बारोवकेयांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठवले. पंचनामा करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तोपर्यंत आरोपी हा स्वत:च पोलीस ठाण्यात पोहोचला होता. पोलिसांनी त्याला अटक केली.