कळमना परिसरातील थरार, दोघेही अल्पवयीन

प्रियकर बोलायचे टाळत असल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने ब्लेडच्या सहाय्याने मध्यरात्री प्रियकराचा चेहरा विद्रूप केला व सकाळी पोलीस ठाण्यात स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणीला ताब्यात घेतले आहे. तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

अनामिका (नाव बदललेले) हिला १८ वष्रे वय पूर्ण व्हायला दोन महिने शिल्लक आहेत,  तर पीडित मुलगा अरविंद (नाव बदललेले) हा १७ वर्षांचा आहे. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. अरविंद हा अकराव्या वर्गात शिकत असून मुलगी बी.ए. प्रथम वर्षांला आहे. ती यापूर्वी घरातून निघून गेली होती.

तिला चांगली सवय लागावी म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला अरविंदच्या घरी ठेवले होते. यादरम्यान ती अरविंदच्या जवळ आली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे अरविंदच्या आईला कळताच तिने मुलीला घरातून हाकलून लावले. तेव्हापासून अरविंद तिच्याशी बोलत नव्हता. काल, सोमवारी रात्री २ वाजता तिने अरविंदला स्वत:च्या घरी भेटायला बोलावले.

अरविंदला भेटण्यापूर्वीच तिने चार ब्लेड विकत घेऊन ठेवल्या होत्या. रात्री तो तिला भेटायला आल्यावर दोघांमध्ये भांडण झाले व तिने दोन्ही हातात ब्लेड घेऊन त्याच्या चेहऱ्यावर वार केले. तो कसाबसा तिथून पळाला व सर्व हकिगत आपल्या आईला सांगितली. त्याच्या आईने त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर सकाळी ते पोलीस ठाण्यात पोहोचले. कळमना पोलिसांनी अनामिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. तिने ठाण्यातच स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. तिला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

चाकू घेऊन लोकांमागे धावला मनोरुग्ण

अंबाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने येथे गर्दी होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एक मनोरुग्ण चाकू घेऊन लोकांच्या पाठीमागे धावत सुटल्याने एकच पळापळ झाली. विवेकानंद स्मारक परिसरात उभे असलेले लोक लहान मुले उचलून पळू लागले. काहींनी जीवाच्या भीतीने पाण्यात उडी घेतली. विकास मराठे (२४) रा. सुभाषनगर असे या मनोरुग्णाचे नाव असून काही तरुणांनी हिंमत दाखवली व त्याला ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. हा प्रकार एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला व व्हिडिओ व्हायरल झाला. त्या आधारावर पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.