23 October 2018

News Flash

शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी तुटपुंज्या सोयीसुविधा

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांसह शासनाच्या मेडिकल, मेयो, डागा या रुग्णालयांत आजही नवजात अर्भकांसह लहान मुलांवर उपचारासाठी आधुनिक सुविधांची कमी आहे, अशी खंत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड  डिसॅबिलिटी (कोमहाड)चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केली.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते. डॉ. उदय बोधनकर अध्यक्ष असलेल्या ‘कोमहाड’ संघटनेत ५४ देशांतील बालरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. शहरातील नवजात बालकांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेची आहे, परंतु त्यांच्या दवाखान्यात आजही पुरेसे बालरोग तज्ज्ञ नाही. काही दवाखान्यात डॉक्टर असल्यास तेथे आवश्यक सुविधा व साधने नाहीत. त्यामुळे येथून रुग्णांना थेट डागा, मेडिकल, मेयो येथे पाठवले जाते. डागात रुग्ण गेल्यास तेथे ‘टर्शरी केयर’ नसल्याचे सांगत मुलांना मेडिकल, मेयोत पाठवले जाते. तेथे दाखल रुग्णांच्या तुलनेत अत्यवस्थ बालकांसह इतर मुलांसाठी आवश्यक जीवनरक्षक प्रणाली व इतर साधनांची कमी आहे. त्यामुळे बालकांच्या उपचारादरम्यान पालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो, असे डॉ. बोधनकर म्हणाले.

महापालिको रुग्णालय आणि डागा रुग्णालयांत लहान मुलांचे एनआयसीयू (अत्यवस्थ) विभाग गरजेचे आहे. मेडिकल, मेयोतही उपचार घेणाऱ्या मुलांची संख्या बघता एनआयसीयूची  संख्या वाढवण्याची गरज आहे. या खाटा वाढवण्यासह जीवनरक्षक प्रणाली, डॉक्टरांची संख्या वाढवल्यास रुग्णालयांत मध्य भारतातून येणाऱ्या बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.

बालकांना होणाऱ्या एकूण आजारांपैकी ९० टक्के आजार टाळता येण्यासारखे असतात. त्यासाठी प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावे, बालकांना स्वच्छ ठेवावे, हाताची नखे वाढू देऊ नये, स्वच्छ पाणी प्राशन करावे, धुळीपासून मुलांचा बचाव, दूषित अन्नाचे सेवन न करणे, आदी स्वरूपाची काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला, डॉ. बोधनकर यांनी दिला.

कुपोषणाची शक्यता

जन्मजात बाळाला सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर काहीही देऊ नये. त्यानंतर सुमारे दोन वर्षांपर्यंत बालकांना पुरवणी पद्धतीने दूध द्यायला हवे. सहा महिन्यानंतर बालकांना जास्त पातळ पदार्थाच्या ऐवजी थोडी घट्ट डाळ व इतर तत्सम पदार्थ खायला द्यावे. त्याने बाळाची वाढ चांगली होते. पालकांनी बालकांना जास्त पातळ पदार्थ नित्याने दिल्यास त्याला कुपोषण होण्याची शक्यता वाढते. त्यातच बाळ कुपोषित दिसल्यास त्याला गूळ, शेंगदाणे, तूप, तेल दिल्यास लोह, प्राथिने व इतर घटक मिळून तो चांगला होऊ शकतो, असेही बोधनकर म्हणाले.

वैद्यकीय संघटनांनी शिबिरांवर भर द्यावा

विद्यार्थ्यांला डॉक्टर होण्यासाठी समाजाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होते, तर दुसरीकडे गोर-गरीब नागरिकांनाही अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हायला हव्या. त्यासाठी सर्व डॉक्टर्सच्या संघटनांनी पुढाकार घेत आदिवासी, दुर्गम भागासह शहरातील गरिबांच्या वस्त्यांमध्ये आरोग्य शिबीर घ्यावे. यात गंभीर रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर औषधोपचार व शस्त्रक्रियाही नि:शुल्क करण्याची गरज डॉ. बोधनकर यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय संशोधन सक्तीचे व्हावे

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रत्येक डॉक्टरला वैद्यकीय संशोधन करणे आवश्यक आहे, परंतु नागपूर जिल्ह्य़ात मेडिकल, मेयोसह खासगी असे तीन वैद्यकीय महाविद्यालये असतानाही फारसे संशोधन होत नाही. हे चित्र बदलून डॉक्टरांना संशोधनाची सक्ती करून त्याचा लाभ थेट रुग्णांना उपलब्ध करण्याची गरज डॉ. बोधनकर यांनी व्यक्त केली.

लसीकरणावर भर हवा

जागतिक आरोग्य संघटनेसह भारत सरकारने लहान मुलांना विविध आजारांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी लसीकरणाला महत्त्व दिले आहे. लसीकरण वाढल्याने बालकांमधील आजारही कमी झाले आहेत, परंतु शासकीय रुग्णालयांत टायफॉईडसह एमएमआरसारख्या काही स्वस्त लसी मिळत नाही. त्या उपलब्ध झाल्यास हेही आजार कमी होण्यास मदत होणे शक्य असल्याचे डॉ. बोधनकर म्हणाले.

स्वयं औषधोपचार धोक्याचा

प्रत्येक बालरोगतज्ज्ञ बालकांना विविध तपासणी करून गरजेनुसार औषधोपचार करतो, परंतु काही पालक सर्दी, खोकला, तापासाठी डॉक्टरांनी पूर्वी बालकाला दिलेले औषध देतात. त्यामुळे बालकांना गंभीर धोका संभवतो, तर बालकांना प्रतिजैविकाची मात्रा अधिक देण्यात आली तर या मुलांतील जिवाणू-विषाणूंची प्रतिकार शक्ती वाढून बालकांना औषधच लागत नाही, असे डॉ. बोधनकर म्हणाले.

 

First Published on January 13, 2018 1:41 am

Web Title: loksatta interview with dr uday bodhankar