नितीन गडकरी यांचा विश्वास; ‘लोकसत्ता’ नागपूर कार्यालयाला भेट

लोकसभेच्या निवडणुकीत  राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ,  महाराष्ट्रातही युती मागील निवडणुकीइतक्याच जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांच्या कामकाजाबद्दल कौतुक केले.

गडकरी यांनी गुरुवारी सायंकाळी  ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकसत्ताचे विदर्भ ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे उपस्थित होते. गडकरी यांनी  देशपातळीवरील विविध विकास कामांची माहिती देतानाच राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले.

केंद्राच्या विरोधात जनभावना असल्याचे त्यांनी नाकारले. देशात भाजपची शक्ती वाढली म्हणूनच परस्परांचे तोंड न पाहणारे विरोधक एकवटले आहेत, परंतु त्याचा विशेष परिणाम होणार नाही. पाच वर्षांत केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामांमुळे देश बदलला आहे त्याचा फायदा होईल, असे गडकरी म्हणाले. पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितले जाते, याकडे  गडकरी यांचे लक्ष वेधले असता  त्यांनी त्याचे थेट  उत्तर देणे टाळले. याप्रकरणी माध्यमांतील बातम्यांवर त्यांनी खापर फोडले. माझ्या विधानाचा त्यांनी विपर्यास्त केला, असे ते म्हणाले. पूर्वी दिल्ली आवडत नव्हती मात्र  आता मी तेथे रमलो आहे असे त्यांनी सांगितले.

संघाची शिकवण

फक्त विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्यावर सरकारचा भर आहे, सर्वसमावेश कामे करण्याची शिकवण मला संघाकडून मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.