ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ राजा आकाश यांचे आवाहन

हल्लीचे दहावी-बारावीचे गुण फसवे आहेत. हे ‘रट्टा मारू’  गुण आहेत. शिकवणी वर्ग आणि पालकांनी मुलांकडून रट्टा मारून घेतलेला असतो. अशा अल्प स्मृतीवर आधारित अभ्यासावरून मुले भरपूर गुण मिळवतात. त्यामुळे गुणांची टक्केवारी बघून नव्हे तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य करिअर निवडा, असे आवाहन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ राजा आकाश यांनी विद्यार्थ्यांना केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. दहावी-बारावीच्या निकालानंतर पालक, मुलांनी करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सांगताना राजा आकाश म्हणाले, विद्यार्थ्यांना भरभरून मिळणारे गुण ‘स्पून फिडिंग’चा प्रकार आहे. भरपूर गुणांमुळे करिअर संबंधीचा कल  समजतोच असे नाही. मुलांना ८० टक्के गुण मिळाले म्हणजे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना जाण्याचा मार्ग मोकळा, असा पालकांचा ग्रह असायचा. त्यातून नको त्या विद्याशाखांना मुलांचे प्रवेश केल्याने, तसेच पुन्हा पुन्हा होणाऱ्या खर्चाची जाणीव करून दिल्याने मुलांना नैराश्य यायचे. त्यामुळे आत्महत्येसारखी टोकाची पावलेही मुले उचलत असत. हल्ली आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. कारण मुलांना भरपूर गुण मिळतात. आता करिअर कोणते निवडावे, याविषयीही पालक आणि पाल्य चोखंदळ झाले आहेत. दहावी-बारावीच्या निकालानंतर मुलांनी नेमके कोणते क्षेत्र निवडावे, त्यांचा नेमका कल काय, आवडीनिवडी काय, त्यांना काय जमू शकते आणि काय नाही, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पालक हल्ली मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला लागले आहेत. हे चांगले संकेत आहेत. नंतर नैराश्य येण्यापेक्षा आणि लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा काही रुपये खर्च करून मानसोपचार तज्ज्ञांकडून पालकांनी मुलांच्या चाचण्या करून घ्याव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मानव्यशास्त्रांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला

एखादा विद्यार्थी जेव्हा २१ व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण करतो, याचा अर्थ दहावी-बारावीनंतर योग्य करिअरची निवड त्याने केलेली असते. हल्ली मानव्यशास्त्रांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येतो. कला शाखेचा ‘कट ऑफ’ ९२-९३ टक्के असा पहावयास मिळतो. बारावी झाल्यानंतर मानव्येशास्त्रात प्रवेश घेऊन समांतरपणे यूपीएससीचा अभ्यास करून विद्यार्थी भरघोस यश मिळवतात, अशीही उदाहरणे राजा आकाश यांनी दिली.

या चाचण्या महत्त्वाच्या

मुलांच्या मानसिक क्षमतेची माहिती घेताना त्यांचे व्यक्तिमत्त्व, कल, आवडीनिवडी, अध्ययन क्षमता, अभ्यासातील प्रेरणा, स्वत:ला जोखणे, परीक्षेची धास्ती घेतात का, नेमकी कशाची भीती वाटते वा वाटत नाही, त्यांच्यातील बलस्थान तसेच मर्यादा यासंबंधीच्या चाचण्या मानसोपचार तज्ज्ञांकडे केल्या जात असल्याचे राजा आकाश यांनी सांगितले.