रिना पोन्नलवारने पित्याच्या खुनाचे रहस्य उलगडले

गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिशय दुर्गम आणि नक्षलवाद्यांचे गढ समजल्या जाणाऱ्या कमलापूर येथील रहिवासी रिना हेमंत पोन्नलवार हिच्या वडिलांचा २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी खून केला. तिचे वडील गावचे सरपंच होते आणि ते पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती पुरवितात, असा संशय घेऊन नक्षलवाद्यांनी तिच्या वडिलांचा खून केला. मात्र, त्यांच्या खुनामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. नक्षलवादी रिनाला दलममध्ये सामील करण्यासाठी हेमंत यांच्यावर दबाव टाकत होते. एकदा तिचे अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, तिच्या वडिलांनी मुलीला नक्षलवादी होण्यापासून वाचविण्यासाठी स्वत:चे प्राण गमविले. नक्षलवाद्यांशी लढताना विरमरण येणाऱ्या सैनिकांना शहीद संबोधले जात असून माझे वडील मुलीच्या रक्षणाकरिता शहीद झाले, या शब्दात तिने आपल्या वडिलांच्या खुनाचे रहस्य ‘लोकसत्ता’समोर उलगडले.

अहेरीपासून ४० किमी अंतरावर असलेले कमलापूर हे नक्षलवाद्यांचा गढ समजण्यात येतो. तिचे वडील हेमंत कृष्णा पोन्नलवार हे गावचे सरपंच होते. त्यांची गावात जवळपास ४ एकर वडिलोपार्जित शेती आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि वनोपजावर चालायचा. आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे, असे स्वप्न तिचे वडील बघत होते. त्यामुळे ते त्यांना शाळेत पाठवत. एक दिवस नक्षलवादी घरी आले आणि वडिलांनी मोठय़ा मुलीला दलममध्ये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ते निघून गेले. परंतु वडिलांनी त्यांचे ऐकले नाही. एक दिवस पुन्हा ते परतले असता वडिलांनी कडाडून विरोध केला. गावाच्या सरपंचानेच नक्षलवादाविरोधात भूमिका स्वीकारल्याने इतर लोकांमधील आपली दहशत टिकविण्याच्या उद्देशाने १० डिसेंबर २००९ च्या रात्री नक्षलवाद्यांनी त्यांचा खून केला. आपले वडील पोलिसांचे खबरे होते, असा अपप्रचार नक्षलवाद्यांनी केला. ते पोलिसांचे खबरे नव्हते, तर मुलीच्या रक्षणासाठी ते शहीद झाले. वडील जर नसते, तर कदाचित आज मी नक्षलवादी झाले असते, हे सांगत असताना रिनाचे डोळे पानावले होते. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आली असता ती ‘लोकसत्ता’शी बोलत होती.

सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा

वडिलांच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून आम्ही गाव सोडले आणि अहेरीत बस्तान मांडले. गाव सोडल्याने उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती गेली. आपले केवळ बारावीपर्यंतच शिक्षण झाले. शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गडचिरोली जिल्ह्य़ातील दुर्गम भागात राहणारे शेकडो लोक नक्षलवाद्यांचे पीडित आहेत. मात्र, सरकारही त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना अन्याय सहन करण्यावाचून पर्याय नाही. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात आणि त्यांना आर्थिक मदतही करण्यात येते. परंतु नक्षलवाद्यांच्या गोळीचे बळी ठरणाऱ्यांच्या कुटुंबांकडेही सरकारने लक्ष द्यावे. त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही रिना म्हणाली.