28 May 2020

News Flash

लोकजागर : टाळेबंदी – काही नोंदी!

१७ मार्चला दिल्लीहून हैदराबादकडे निघालेली तेलंगणा एक्सप्रेस करोनाची वाहक ठरली की काय, या शंकेने सध्या प्रशासनाला घेरले आहे

संग्रहित छायाचित्र

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

१७ मार्चला दिल्लीहून हैदराबादकडे निघालेली तेलंगणा एक्सप्रेस करोनाची वाहक ठरली की काय, या शंकेने सध्या प्रशासनाला घेरले आहे. या गाडीने नागपूरला आलेले व वेगवेगळ्या डब्यात प्रवास केलेले दोन प्रवासी करोनाबाधित ठरले आहेत. याच गाडीतून येथे किती जण उतरले ते नेमके कुठे आहेत, त्यातले कुणी बाधित आहेत का या प्रश्नांनी सध्या प्रशासनाला हैराण करून सोडले आहे. हे उदाहरण घबराट पसरावी यासाठी दिलेले नाही. हा साथीचा आजार किती भयावह आहे हे लक्षात घेत काळजी घेणे कसे आवश्यक आहे यासाठी दिले आहे. सध्या संपूर्ण विदर्भ टाळेबंदी अनुभवतो आहे. या काळात लोकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. तरीही काही टगे मला काय होते अशी बेफिकरी दाखवत बाहेर फिरतात. भयाण शांततेतही मस्ती करावी असे त्यांना वाटते. हे सारे चिंताजनक आहेच शिवाय आरोग्याच्या प्रश्नावर आपण किती बेफिकीर आहोत हे दर्शवणारे आहे. नागपूर असो वा विदर्भ पोलिसांनी सर्वच ठिकाणी संयम दाखवला. तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. यात केवळ सामान्यच नाहीत तर अनेक पुढारी सुद्धा आहेत. आमदार प्रकाश गजभिये हे त्यातले एक. त्यांना या काळात अचानक गरिबांचा कळवळा आला. त्यांनी सारे नियम पाळून तो व्यक्त केला असता तर एकदाचे समजून घेता आले असते, पण नेत्याने नियम पाळायचे नसतात हे गजभियेंच्या अंगी ठसलेले. त्यांनी गरिबांना शिधावाटप करण्यासाठी थेट रविनगर चौकात रांगच लावली. बेरोजगारीचे चटके सहन करणाऱ्या अनेकांनी येथे झुंबड केली. साथसोवळे पाळण्याच्या या काळात चौकात प्रचंड गर्दी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर गजभियेंच्या उत्साहाला आवर बसला.

या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका गरिबांना बसणार आहे. त्यांना मदतीची गरज आहे हे खरे पण ती नियमात राहून करण्याची सजगता नेते दाखवायला तयार नाहीत. उपराजधानीचे शहर असल्याने गजभियेंचा प्रताप नजरेत भरला. विदर्भात अनेक ठिकाणी असे घडले असेल यात शंका नाही. याच काळात नियमाप्रमाणे वागून मदत करणाऱ्या नेत्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. विदर्भात रब्बीचा हंगाम सर्वदूर नाही. कोरडवाहू शेती असल्याने त्यात काम करणारे लाखो लोक उन्हाळ्यात रिकामे असतात. त्याचा फायदा घेत ते शेजारच्या राज्यात मजुरीसाठी जातात. अचानक लागलेल्या या टाळेबंदीमुळे सध्या शेकडो मजूर दक्षिणेकडील राज्यात अडकले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने अगदी तत्परतेने पावले उचलली. त्यामुळे अडकलेल्यांच्या मनातील भीती दूर झाली व दिलासा मिळाला. शेजारच्या राज्यातून विदर्भात आलेल्या मजुरांच्या सोयीसाठी सुद्धा प्रशासनासोबतच अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची सरबराई करणे व संकटाच्या काळी एकत्र येणे ही वैदर्भीयांची खासियत आहे. या काळात या एकत्र येण्याचे दर्शन ठिकठिकाणी झाले. विदर्भातील सारे मंत्री, माजी मंत्री या मजुरांसाठी धडपड करताना दिसले.

अतिशय विषण्ण करणाऱ्या वातावरणात हे दिलासा देणारे क्षण एकीकडे जनता अनुभवत असताना दुसरीकडे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत स्वत:ची पोतडी भरणारे महाभाग सुद्धा याच काळात दिसले. विदर्भातील एक खासदार गरिबांना मदत करायचे सोडून त्यांनी त्यागलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांना तुरुंगात भेटायला गेले. या भेटीवर कुणी शंका घेऊ नये म्हणून कैद्यांना मास्क वाटपाचा बहाणा शोधण्यात आला. बाहेर असलेल्या नागरिकांना मास्क मिळत नसताना या खासदारांचे कैदीप्रेम उफाळून यावे यातच सारेकाही आले. साऱ्यांच्या प्रयत्नाने विदर्भात करोनाग्रस्तांची संख्या फार वाढलेली दिसत नसताना संशयितांच्या बेजबाबदार वागण्याने होणाऱ्या मन:स्तापाला सर्वाना सामोरे जावे लागत आहे. खरे तर विदेश प्रवासाची पाश्र्वभूमी असलेल्या रुग्णांची संख्या निश्चित झाल्यावर सुमारे एक आठवडा विदर्भात रुग्णसंख्येत वाढ झाली नव्हती. त्यामुळे प्रशासनात समाधानाचे वातावरण होते नंतर अचानक देशांतर्गत प्रवास केलेल्या संशयितांची नावे समोर आली व रुग्णसंख्या वाढली. या मुद्यावर एवढी जाणीवजागृती करून सुद्धा संशयित अतिशय बेफिकरीने वागत होते. बुलढाण्याचा मरण पावलेला रुग्ण तर अंगात ताप असताना दहा गावे फिरला. संशयित असतानाच मृत्यू झाल्याने त्याच्या अंतयात्रेत शेकडो लोक सहभागी झाले. या सर्वाना हुडकून काढण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर ठाकले आहे.

नागपूरच्या एका रुग्णाने तर लक्षणे कळून सुद्धा खासगी रुग्णालयात उपचार घेताना माहिती दडवली. त्यामुळे हे रुग्णालयच बंद करण्याची वेळ आली. याच रुग्णामुळे अनेक डॉक्टरांवर विलगीकरणात राहण्याची वेळ आली. हा सारा प्रकार बेजबाबदारपणाचा आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा लोक या मुद्यावर अजून गंभीर व्हायला तयार नाहीत. या आजाराचा वेगाने होणारा प्रसार हीच सर्वात मोठी समस्या आहे. रुग्ण मोठय़ा संख्येत वाढले तर त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रशासनासमोरचा यक्षप्रश्न आहे. अशावेळी प्रसार रोखणे हाच यावरचा उपाय आहे. हे करायचे असेल तर नागरिकांची त्याला साथ हवी. नेमकी तीच उणीव अनेक ठिकाणी दिसून येते. या टाळेबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाही. गर्दी होते म्हणून बाजार समित्या बंद करणे हा तातपुरता उपाय झाला. मोकळ्या मैदानात समित्यांना बाजार उभा करू देणे, या बाजारांचे विभाजन करणे यासारखे उपाय दिलासा देऊ शकतात. या संदर्भात वध्र्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय ठरावा असाच आहे.

अशा काळात साठेबाज डोके वर काढतात. त्यांना आवरण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण योग्य व्हावे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. विदर्भातील बहुतांश व्यापारी केंद्रात बाहेरचे मजूर काम करतात. हे सर्वजण भीतीने गावाकडे निघून गेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोहोचलेला माल दुकानांमध्ये न्यायलाच कुणी नाही. त्याचा परिणाम टंचाई व भाववाढ होण्यात झाला आहे. यातून प्रशासनाने मार्ग काढायला हवा.

अनेक दुकानदार केवळ भीतीपोटी वाहतुकीचे परवाने काढायला जात नाहीत. ती दूर करण्याची गरज आहे. अख्ख्या विदर्भात मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा आहे. जिथे या वस्तू उपलब्ध आहेत तिथे चढय़ा दराने विकल्या जात आहेत. प्रशासनाला याची जाणीव आहे. तरीही हे पुरवठय़ाचे प्रमाण वाढावे यासाठी फार प्रयत्न होताना दिसत नाही. येणारा काळ हा कसोटीचा आहे. त्याला धैर्याने तोंड द्यायचे असेल तर नागरिकांच्या मनातील अनावश्यक भीती घलवून सामूहिकपणे सर्वानी काम करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न होतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 1:57 am

Web Title: loksatta lok jagar article by devendra gawande bn 97
Next Stories
1 राज्यात धान्याचा तुटवडा!
2 सॅनिटायझर टंचाईवर मद्यउत्पादकाच्या साथीने मात!
3 देशाच्या तुलनेत राज्यात करोना मृत्यूचे प्रमाण अधिक!
Just Now!
X