गेल्यावर्षी प्राथमिक फेरीतूनच बाहेर गेलेले आणि यावर्षी पुरुषोत्तम करंडकमध्ये विजयी न ठरलेल्या ‘कस्र्ड किंग’ने मेहनती अंती लोकांकिकेची प्राथमिक फेरी पार करीत द्वितीय फेरीत प्रवेश केला आणि त्यांचा प्रतिस्पर्धी एकांकिकांनीही धस्का घेतला आहे. लोकसत्ताच्या ‘लोकांकिका’ या उपक्रमांतर्गत नुकतीच प्राथमिक फेरी पार पडली.

यात रेनायसन्स महाविद्यालयाची ‘मलबा’, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाची ‘कस्र्ड किंग’, डॉ. विठ्ठलराव खोबरागडे महाविद्यालयाची ‘उपोषण’, चंद्रपूरच्या यादवराव पोरशेट्टीवार कला महाविद्यालयाची ‘लायसन्स’ आणि धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘भारत अभी बाकी है’ या पाच एकांकिका विभागीय अंतिम फेरीत पोहोचल्या असून ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह’ अकॅडमी व ‘झी युवा’ यांचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर ‘आयरिश प्रॉडक्शन’ असून गेली तीन वर्षे ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवरील तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लक्ष रुपयांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत.

तीच ती प्रेमकथा, फसवणूक किंवा सासू-सूनेतील वाद दाखवण्यापेक्षा वेगळा प्रयत्न महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. नाटक कोळून प्यायलेला, गाजलेल्या नट रसिकाश्रय न मिळाल्याची खंत बाळगून जगतोय, या आशयावर आधारित ‘कस्र्ड किंग’ परीक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यांनी विभागीय अंतिम फेरीत एकांकिकेला स्थानही दिले. वेगळे काहीतरी करण्याच्या मानसिकतेतूनच प्रसन्न काळे आणि गौरव श्रीरंग यांनी हास्य, अद्भूत, शांत, करुणा..इत्यादी नऊ रस त्या एकांकिकेत ओतण्याचा प्रयत्न केला. परीक्षेमुळे थोडं कमीजास्त झालं पण, परीक्षकांना आवडले आणि आणखी काय सुधारणा करता येतील, याचे मार्गदर्शनही केल्याने आमचा उत्साह वाढला आहे, असे गौरव व प्रसन्न यांनी सांगितले.

दोघांनीही बऱ्याच स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. नाटय़शास्त्राचे धडे देणाऱ्या काही कार्यशाळाही त्यांनी केल्या आहेत. नाटय़शास्त्रात उत्तरोत्तर विकसित होत राहण्यासाठी वर्गापेक्षा मैदानात याच विषयावर गप्पा, चिंतन, मनन करण्यात ते बराच वेळ घालवतात. शिवाय त्यांचे मुंबई किंवा लखनौचे मित्र येतात तेव्हा त्यांच्याकडून नाटकाविषयी तासन्तास ऐकत राहण्यात ते वेळ घालवतात. एकूण नाटय़वेडय़ा प्रसन्न आणि गौरव दोघांनाही या क्षेत्रात करिअर करायचे आहे. म्हणूनच ‘कस्र्ड किंग’ काल्पनिक पण सर्वच पातळीवर कस लावणाऱ्या विषयावरील एकांकिका त्यांनी निवडली. सिनेमा आणि नाटकाचा विचार केल्यास लोक ३०० रुपयांचे तिकीट घेऊन सिनेमा पाहतात पण, नाटक नाही, अशी खंत इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनाही आहे.

आम्ही गॅदरिंग, स्पर्धा महाविद्यालयात आयोजित करतो. शिवाय नृत्य, नाटकासाठी विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयातील स्पर्धासाठीही प्रोत्साहन देतो. आमच्या महाविद्यालयाची ‘कस्र्ड किंग’ विभागीय अंतिम फेरीत पोहोचली आहे आणि त्यासाठी लागणारी मदत नक्कीच मुलांना करणार आहोत. शिवाय नऊ डिसेंबरला, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायंटिफिक सभागृहात उपस्थितही राहणार आहोत.

-आशीष उजवणे,  प्राचार्य, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय

गौरव श्रीरंग  आणि प्रसन्न काळे

गेल्यावर्षी ‘लोकांकिके’च्या पहिल्याच फेरीत त्यांची ‘मनुस्मृती’ एकांकिका बाद झाली. तर यावर्षी ‘कस्र्ड किंग’ साकारताना पुरुषोत्तम करंडकमध्येही निवड झाली नाही. त्यामुळे वाईट वाटत होतं आणि रागही होता. त्यामुळे लोकांकिका करायचीच हे ठरवून विनोबा विचार केंद्रात आलो. तर दोन गोष्टींनी थक्क झालो. पहिल्याच फेरीत नावाजलेले परीक्षक समोर होते आणि दुसरे म्हणजे आम्ही टीशर्ट घालून प्राथमिक फेरीत एकांकिका करायला आलो होतो. बाकी सर्व कॉस्च्युम, मेकअपमध्ये अगदी लांबून गाडय़ा करून आले होते. तेव्हा आम्हाला कळले की लोकांकिका म्हणजे साधे गणित नाही. ताबडतोब घरी गेलो आणि किंगचे कॉस्च्युम घेऊन आलो. लोकांकिकेतील पहिली, दुसरी, तिसरी पातळी म्हणजे तगडी स्पर्धा आहे. २० नाटकांतून ५ विभागीय अंतिम फेरीसाठी. त्यानंतर पाचातून एकच महाअंतिम फेरीसाठी आणि मग तेथेही सातातून एकीचीच निवड! म्हणजे जबरदस्त!

– गौरव श्रीरंग आणि प्रसन्न काळे,  महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय

तरुणाईच्या नाटय़ाविष्काराला दाद देण्यासाठी अवश्य या!

विभागीय अंतिम फेरी ९ डिसेंबर २०१६

* स्थळ:  सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर</p>

* वेळ : सकाळी ११ वाजता.