तरुणाईच्या प्रचंड जल्लोषात निकालाची घोषणा; आता मुंबईत रंगणार महाअंतिम फेरीचा थरार

सर्वच चमूंचे दमदार सादरीकरण.. त्यामुळे क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा..चौफेर सुरू असलेला तरुणाईचा जल्लोष.. परीक्षकांचे निकालपत्र पाहुण्यांच्या हाती पोहोचलेले.. अखेर तो क्षण आला.. निकालपत्राचे वाचन सुरू झाले..तृतीय क्रमांक जाहीर झाला.. द्वितीयचीही घोषणा झाली.. आता प्रतीक्षा विजेत्याची होती.. हृदयाची स्पदंने वेग घेत असतानाच काही क्षणांच्या निरव शांततेत ‘दिव्यदान’चे नाव निनादले आणि विजेत्या चमूने एकच जल्लोष केला.

लोककला जिवंत राहावी म्हणून धडपड करणारी ‘तमासगीर’ सर्वोत्कृष्ट ठरणार की, ‘मुक्ताई’मधून मांडण्यात आलेल्या भरकटलेल्या मनाचा लढा. रसिक प्रेक्षकांच्या मनात असे द्वंद्व सुरू असतानाच या सर्व संकल्पनांना मागे टाकत वर्तमानातील अवयवदानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या ‘दिव्यदान’ या एकांकिकेने लोकसत्ता लोकांकिकेच्या महाअंतिम फेरीत धडक दिली.

एकांकिका स्पर्धा आणि तरुणाईचा जल्लोष हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. महाविद्यालयीन तरुणाईच्या जल्लोषात गुरुवारी लक्ष्मीनगर स्थित सायंटिफिक सभागृहात दिवसभर विभागीय अंतिम फेरीमध्ये पाच दर्जेदार नाटकांचे सादरीकरण झाले. यामध्ये आजची तरुणाई नेमका काय विचार करते, तो विचार शब्दांत कसा मांडला या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकांकिकांमधून सहज सापडली. एकांकिका बघण्यासाठी मोठय़ा संख्येने महाविद्यालयीन तरुणाईसह पालक आणि रसिकश्रोत्यांनी गर्दी केली होती. सायंकाळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार, नाटय़कलावंत डॉ. स्मिता माहूरकर, परीक्षक ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक कुमार सोहोनी, नाटय़लेखक व दिग्दर्शक गिरीश जोशी, लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट नाटकांसह अन्य १० पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.

परीक्षक कुमार सोहोनी यांनी तंत्राच्या आहारी न जाता कथेमध्ये जीव ओतावा असा सल्ला दिला. नाटक असो की सिनेमा कथा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे तंत्राने नाही तर कथेने नाटक दर्जेदार होते. त्यावर नवकलावंतांनी भर द्यावे असे आवाहनही केले.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पध्रेचे ‘मे.बी.जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ हे सहप्रायोजक आहेत, तर ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘एम.के. घारे ज्वेलर्स’ हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट, मालिकांमध्ये संधी देणारे ‘आयरिश प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली.

अंतिम निकाल

* सर्वोकृष्ट एकांकिका प्रथम : ‘दिव्यदान’

* सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘मुक्ताई’

*सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘तमासगीर’

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : क्रिष्णा लोखंडे (दिव्यदान)

*सर्वोत्कृष्ट लेखक : अभय नवाथे (मुक्ताई)

* सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) : रसिका बाकरे (दिव्यदान)

* सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) : प्रसन्न काळे (मुक्ताई)

* सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना : आकाश गिरमकर (संताजी महा.)

* सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : रितीक अमळकर (तमासगीर)

* सर्वोत्कृष्ट संगीत : मैथीली मांडवगणे (दिव्यदान)

व्यापक संधी

‘लोकसत्ता’ने ‘लोकांकिका’च्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना नाटय़क्षेत्रात कलागुण सादर करण्याची व्यापक संधी दिली आहे. यातून अनेक गुणी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आदींचा शोध लागतो आहे. अशा अनेकांना कलाक्षेत्रात पुढे जाण्यास मदत मिळते. उदयोन्मुख कलाकार घडवण्यास मदत होते. थेट व्यासपीठ कलाविषयक जाणीव, गुणवत्ता याचा शोध नेमका कोठे लागेल हे सांगता येत नाही. अशांचा शोध आणि संधी उपलब्ध करून देण्याचे काम ‘लोकसत्ता’ व्यासपीठाच्या माध्यमातून होत आहे, असे मत डॉ. स्मिता माहूरकर यांनी व्यक्त केले.

कला, संस्कृती टीकवणारे व्यासपीठ

लोकसत्ता लोकांकिका या स्पध्रेकडे महाविद्यालयीन तरुण रंगकर्मीची एक प्रयोगशाळा आहे. येथे तुम्हाला संधी मिळते. यातूनच तुमच्याचमध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील मंचावर सादरीकरणाचा विश्वास निर्माण होईल. त्यामुळे हे व्यासपीठ कौतुकास्पद आहे. कला आणि संस्कृती जपायची असेल तर त्यासाठी एकांकिकांचे हे लोकसत्ताने निर्माण करून दिलेले व्यासपीठ फार मोठी भूमिका बजावत आहे, असे मत प्राचार्य डॉ. सुरेंद्र जिचकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

जाणत्या दर्दीची दिलखुलास दाद

लोकसत्ता लोकांकिका म्हणाल्या की तरुणाईचा जल्लोष आलाच. गुरुवारी दिवसभर झालेल्या नाटकांना तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येक नाटकाला उत्तम दादही देण्यात आली. यात तरुणींचा उत्साहा काही निराळाच होता. त्यात कमिन्स महिला अभियांत्रिकीने प्रथम पारितोषिक मिळाल्याने गर्ल्स रॉक यावर शिक्कामोर्तब झाले.

लोकसत्ता लोकांकिकामुळे आमच्यासारख्या नवकलावंतांना संधी मिळाली. लोकसत्ताचे व्यासपीठ हे माझ्यातील कलावंताला उभारी देणारे ठरेल. प्राथमिक फेरीतील अनुभव फार मस्त होता. त्यात झालेल्या चुका दुरुस्त करून आता विभागीय फेरीमध्ये विजयी झालो. मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीचे काहीसे दडपण आहे. त्यासाठी आता कसून तयारी करावी लागणार आहे. आव्हान मोठे आहे.

– रसिका बाकरे, विद्यार्थिनी

आमची स्पर्धा आमच्याशीच

अभ्यासाव्यतिरिक्त वेगळे व्यासपीठ आणि करिअरचे वेगळे क्षेत्र ‘लोकांकिके’मुळे निवडण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘स्टेज डेअरिंग’, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. स्पर्धेत कोणीतरी जिंकणारच! आम्ही आमच्या परीने ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न केला. आमची स्पर्धा आमच्याशीच होती. एकांकिकेतून उपस्थितांवर छाप सोडून गेलो हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

– जुहिल उके, विद्यार्थी

लोकांकिका जबरदस्त!

नाटकाचा दिग्दर्शक म्हणून एक चांगला अनुभव गाठीशी आहे. अंतिम फेरीत एकांकिका सादर केल्याने झाल्याने जबाबदारी वाढली आहे. स्पर्धेची काठीण्य पातळी वाढली आहे. नागपुरात अनेक स्पर्धा होतात. अगदी मालती करंडकपासून ते पुरुषोत्तम करंडकपर्यंत पण, लोकांकिका जबरदस्त आहे.

– प्रसन्न काळे, दिग्दर्शक व कलावंत.

अविस्मरणीय अनुभव

लोकांकिकेच्या सर्वच फेरींमधील नाटकांचा उत्तम अनुभव आहे. नागपूरबाहेरचे परीक्षक असल्याने नाटक मनमोकळेपणाने सादर केले. नागपुरात व्यावसायिक नाटकांची फारशी निर्मिती होत नाही. लोकांकिकेमुळे नागपूरबाहेरची रंगभूमी, तांत्रिकी माहिती किंवा मार्गदर्शन मिळण्याची संधी आहे.

– आदिती आंबेकर, विद्यार्थिनी

नवकलावंतांना संधी

प्राथमिक फेरीतील एकांकिकेतील उणिवा भरून काढून ते आणखी उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न अंतिम फेरीत केला. कलाकृती सादर करताना वेळेचे बंधन असते. तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून नाटकाचे सादरीकरण केले. काहीही असो मात्र, लोकसत्ता लोकांकिकांमुळे मला पहिल्यांदा एकांकिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

– रोहित घांगरेकर, विद्यार्थी

दर्जेदार नाटकांचे व्यासपीठ

लोकसत्ता लोकांकिकांचा दर्जा मोठा असल्याने दिग्दर्शनाचे एक दडपण असतेच. त्यातच माझा हा पहिलाच प्रयत्न होता. मात्र, उत्तम नाटक देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुढे आणखी लोकसत्ता लोकांकिकांमध्ये दर्जेदार नाटक सादर करण्याची एक उमेद मिळाली आहे.

– शर्वरी दीक्षित, कलावंत आणि दिग्दर्शक

खूप शिकायला मिळाले

मी एकांकिकांमध्ये अनेकदा भाग घेतला आहे. मात्र, लोकसत्ता लोकांकिकांचे व्यासपीठ मोठे आहेत. यातून आमच्यासारखा नवकलावंतांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. थॅक्स लोकसत्ता.

– रेणुका खानझोडे, विद्यार्थिनी

समर्थ व्यासपीठ मिळाले

लोकसत्ता लोकांकिकांमुळे आमच्या मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. नाटय़क्षेत्राकडे मुलांना जाऊ द्यायचे की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये पालक असतात. मात्र, जेव्हा लोकसत्तासारखे व्यासपीठ उपलब्ध होते तेव्हा हा तिढा सुटतो. यातुन आमच्या मुलांना मोठे होण्याची संधी मिळेल.

– रागिणी जयंत काळे

कलावंत घडण्याची संधी

माझ्या बहिणीने नाटकात भाग घेतला आहे. स्पध्रेत उतरण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उत्साह आहे. मी याआधीही लोकसत्ता लोकांकिका बघितल्या आहेत. त्यामुळे तिला स्पध्रेत भाग घेण्यासाठी आम्ही घरून मोकळीक दिली. लोकसत्ताच्या दर्जेदार स्पध्रेमुळे मुलांना समोर जाण्याची संधी मिळते हे विशेष.

– हिमांशू राठोड

वाचनाची गोडी निर्माण होते

लोकसत्ता लोकांकिकांमुळे नाटय़क्षेत्राची संस्कृती टिकवण्याचा चांगला प्रयत्न होत आहे. यामुळे मुलांनाही वाचनाची आणि नवीन विषय शिकून घेण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे मुलांसाठी ही स्पर्धा फारच उपयोगी अशी आहे.

– अंजली जोशी