लोकसत्ता लोकांकिका स्पध्रेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवक-युवतींना अभिनयाची नवी संधी मिळाली आहे. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयीन युवक-युवती मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. तुलनेने यावर्षी त्यांचा सहभागही अधिक आहे. थोडीथोडकी नव्हे, तर यावर्षी २९ महाविद्यालये यात सहभागी झाली आहेत. या युवक-युवती आणि परीक्षकांनी या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाविद्यालयाच्या व्यासपीठावर अभिनय सादर केला, पण लोकसत्ता लोकांकिकाच्या निमित्ताने मोठे व्यासपीठ मिळाले. आपल्याच सहकाऱ्यांसमोर अभिनय सादर करणे ही वेगळी बाब, पण अभिनयाचे परीक्षण होत असेल, तर थोडे दडपण येते. मात्र, या व्यासपीठामुळे खूप काही नवे अनुभव येत आहेत. अभिनयातील नवे बारकावे अभिजित गुरू आणि समिधा गुरू यांच्याकडून शिकायला मिळत आहेत.
नवीन असल्यामुळे चुका भरपूर होत आहेत, तरीही परीक्षकांसमोर सादरीकरण करत आहोत, याचा आनंद अधिक आहे. विषय काय निवडायला हवे, अभिनयात काय बदल हवा, या गोष्टी आता शिकलो तर पुढल्या सादरीकरणाच्या वेळी आणखी मदत होईल. विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया त्यांच्यातील उत्साहाची जाणीव करून देत होत्या. त्यांच्यातील शिकण्याची जिद्द, अभिजित गुरू आणि समिधा गुरू यांच्याकडून अभिनयाचे बारकावे शिकण्याची तयारी यामुळे एक वेगळाच माहोल लोकसत्ता लोकांकिकाच्या व्यासपीठावर जाणवत होता.
विशेषत: बाहेर गावाहून इथपर्यंत येऊनही कोणताही थकवा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता, तर नवे काहीतरी शिकण्याची आणि सादरीकरणाची उर्मी त्यांच्यात जाणवत होती.

मुलांना अभिनयाची जाणीव आहे, पण मार्गदर्शनाचा अभाव त्यांच्यात अजूनही जाणवतो. या नव्या पिढीला मार्गदर्शन मिळाले तर मोठी नाटय़चळवळ नागपुरात उभी राहू शकते. मी स्वत: लेखक असल्यामुळे विषयांचा अभाव येथे जाणवत आहे. त्यासाठी लिखाणाच्या कार्यशाळा होणे आवश्यक आहेत. त्याशिवाय, नाटकाच्या विषयात वैविध्य येणार नाही. मुले बघूनबघून शिकतात, पण त्याहीपेक्षा मार्गदर्शन मिळाले तर अभिनयात अजून जिवंतपणा आणता येईल.
– अभिजित गुरू, आयरिश प्रॉडक्शन

नाटकांमध्ये विषयाचे जेवढे वैविध्य तुम्ही आणाल, तितका अभिनयाला अधिक वाव मिळेल. अर्थातच, त्यासाठी वाचन हवे. वाचन असेल तर विषयातील खोलीही कळते आणि अभिनयात त्यानुसार परिवर्तन घडून येते. मुळात भाषेवर प्रभुत्त्व हवे आणि त्यासाठी नाटके बघायला हवी, वाचायला हवी. कार्यशाळांमधून खूप काही बदल घडून येतो. त्यामुळे कार्यशाळा व्हायलाच हव्या. जुनी पिढी तर मार्गदर्शनासाठी कधीही तयार होईल. नव्या पिढीला मात्र मार्गदर्शन घेणे कमीपणाचे वाटायला नको.
– समिधा गुरू, आयरिश प्रॉडक्शन

समाजातील ज्वलंत विषय घेऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एकांकिका सादर होत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी कलावंतांना लोकांकिका महोत्सवाची पर्वणी आहे, पण काही एकांकिका नवख्या वाटत आहेत. अभिनय, लेखन, दिग्दर्शनाचे धडे देण्यासंदर्भात लोकांकिका महोत्सवाच्या दोन महिन्यांपूर्वी नाटय़ शिबीर घ्यावे, असे मला वाटते. त्यासाठी नाटय़ परिषद नागपूर शाखा आणि मी व्यक्तीगत स्वरूपात पूर्ण मदत करेल.
– नरेश गडेकर, परीक्षक
मुलांमध्ये उत्साह भरपूर आहे, फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना अभिनयाची ती दिशा दाखवली आणि मार्गदर्शन केले, तर नक्कीच ते अभिनयात उंची गाठू शकतील. महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य त्यांना नाटक सादर करण्यासाठी प्रोत्साहन देतात, पण त्यावेळी ते स्वत: हजर होत नाही. सादरीकरणात त्यांना शिक्षक, प्राचार्याची सोबत मिळत नाही, अशावेळी ते हतबल होतात.
श्रीदेवी प्रकाश देवा, परीक्षक