नक्षलवादाकडे वळवणारे तीन दशकापूर्वीचे वास्तव सर्वोत्कृष्ट ठरणार की, पथनाटय़ सादर करणाऱ्यांनी त्यांच्या नाटय़ातून मांडलेला कामगारांचा लढा! रसिक प्रेक्षकांच्या मनात असे द्वंद्व सुरू असतानाच या सर्व संकल्पनांना मागे टाकत वेश्याव्यवसायातील वेश्यांच्या मुलीच्या भूत, वर्तमान आणि भविष्यावर आधारित ‘विश्वनटी’ या एकांकिकेने ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीत धडक दिली. नागपूर विभागातून सर्वोत्कृष्ट ठरलेली विठ्ठलराव खोब्रागडे आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालयाची एकांकिका आता मुंबईतील महाअंतिम फेरीत इतर सात विभागांमधून निवडलेल्या सात सर्वोत्कृष्ट एकांकिकांसह सादर होणार आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पध्रेची नागपूर विभागाची अंतिम फेरी बुधवारी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडली. प्राथमिक फेरीतील २९ एकांकिकांच्या तगडय़ा स्पर्धेतून या विभागीय अंतिम फेरीत आलेल्या पाच एकांकिकांमध्ये ही स्पर्धा रंगली. या पाचपैकी ‘उलगुलाल’, ‘तू जिंदा है’ आणि ‘विश्वनटी’ या तीन एकांकिकांमध्ये चांगलीच चुरस होती. मात्र उत्तम विषय, सकस संहिता आणि भक्कम सादरीकरण यांच्या जोरावर ‘विश्वनटी’ने अंतिम फेरीवर आपली मोहोर उमटवली. या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेसह पाच पारितोषिकांवर आपला दावा सांगितला.

‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने राज्यभरातील आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेची महाअंतिम फेरी आता १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत रंगणार आहे. ९३.५ रेड एफएम रेडिओ पार्टनर आणि झी मराठी नक्षत्र टेलिव्हिजन पार्टनर असलेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नागपूरची ‘विश्वनटी’ उर्वरित सात विभागांच्या एकांकिकांना टक्कर देण्यासाठी सज्ज होणार आहे. या स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कलचे आणि टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शनचे प्रायोजकत्व लाभले आहे. नागपूरच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, ज्येष्ठ अभिनेते मुकुंद वसुले आणि नाटककार व अभिनेते पराग घोंगे यांनी जबाबदारी सांभाळली. तर ज्येष्ठ रंगकर्मी मधू जोशी पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : ‘विश्वनटी’
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : ‘उलगुलाल’
सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : ‘तू जिंदा है’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : स्नेहलता तागडे (विश्वनटी)
सर्वोत्कृष्ट लेखक : अश्लेश जामरे (विश्वनटी)
सवरेत्कृष्ट अभिनय (स्त्री) : स्नेहलता तागडे (विश्वनटी)
सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) : समीर बाहबुधे, हृषीकेश पोहणकर, वैभव नक्षणे
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : ‘जननी जन्मभूमीश्च’
सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : विजय सपकाळ (उलगुलाल)
सर्वोत्कृष्ट संगीत : अमोल बारसागडे (विश्वनटी)