दोन दिवस रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीचा आज शनिवारी समारोप झाला. या स्पर्धेत विभागीय अंतिम फेरीसाठी पाच एकांकिकांची निवड करण्यात आली.

सर्वोदय  आश्रम विनोबा विचार केंद्रातील सभागृहात शुक्रवारी दोन तर शनिवारी सहा एकांकिका सादर करण्यात आल्या. प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. परीक्षेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृती सादर केल्या. सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला रसिकप्रेक्षकांनीही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी परीक्षक म्हणून नाटय़कलावंत अभिजीत झुंजारराव, लेखिका व दिग्दर्शिका डॉ. स्मिता माहूरकर यांनी काम पाहिले. आयरिस प्रॉडक्शनच्या श्रुती रानवडे यावेळी उपस्थित होत्या.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

* संताजी महाविद्यालय, नागपूर     – मुक्ताई

* वसंत शिक्षण महाविद्यालय, नागपूर – अतिथी

* कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय – दिव्यदान

* धरमपेठ विज्ञान महाविद्यालय     – हिरवीन

* व्ही.एम.व्ही. महाविद्यालय    – तमासगीर

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

लोकसत्ता लोकांकिकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पाय ठेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. दरवर्षी वेगळे विषय लोकांकिकाच्या व्यासपीठावरून मांडले जातात. या व्यासपीठावर हे विद्यार्थी कलावंत इतका दर्जेदार नाटय़विष्कार सादर करत असतील, तर ही लोकसत्ताच्या यशस्वी उपक्रमाची पावती आहे.

— श्रुती रानवडे, आयरिस प्रॉडक्शन

या स्पर्धेद्वारे राज्यपातळीवर विद्यार्थी कलावंतांना लोकसत्ताने मोठे व्यासपीठ  उपलब्ध करून दिले आहे.  या स्पर्धामधून एक आश्वासक चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील मुलगा देखील त्याची अभिव्यक्ती चांगल्या पद्धतीने मांडत आहे. सरावाने ही अभिव्यक्ती आणखी उजळून निघेल.

—अभिजीत झुंजारराव, परीक्षक.

मुलांनी विषय छान मांडले आहेत, त्यातून चांगले विचार समोर येत आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या आतापर्यंत सादर झालेल्या सर्व कलाकृतीतून विद्यार्थी कलावंतांची समज वाढलेली दिसून येते. यानिमित्ताने का होईना, त्यांचे वाचन वाढत असल्याचे लक्षात येत आहे.

-डॉ. स्मिता माहूरकर, परीक्षक.

ठाणे, मुंबई, रत्नागिरीत प्राथमिक फेरीला सुरुवात

ठाणे  : उत्कृष्ट कथेला संवादकौशल्य आणि उत्तम अभिनयाची जोड देत सर्वोत्तम सादरीकरणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली कलाकारांची धडपड, असे चित्र ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ स्पर्धेतील ठाणे विभागीय फेरीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. महाविद्यालयीन तरुणाईला कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवारी ठाण्यात उत्साहात झाली. याच फेरीचा दुसरा भाग रविवार, ८ डिसेंबरला होणार आहे. मुंबई, रत्नागिरी विभागातही प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली.