देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com

खरे तर दखल घ्यावी असे किशोर तिवारींचे कर्तृत्व नाही. मात्र सध्या त्यांच्यात मणीशंकर अय्यर संचारला की काय, अशी शंका अनेकांना यायला लागली आहे. भाजपचे नेते व या पक्षाच्या धोरणाविषयी त्यांनी थेट संघाकडे केलेल्या तक्रारींतील भाषा बघितली की ती रास्त वाटायला लागते. त्यामुळेच कोण हे तिवारी, या प्रश्नाचा वेध घेणे गरजेचे ठरते. सध्या शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्षपद सांभाळणारे तिवारी मूळचे यवतमाळचे. तेथील राजकारणात त्यांचा प्रभाव शून्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे त्यांचे कर्तृत्व एवढेच की त्यांनी शेतकरी आत्महत्या हा विषय माध्यमांच्या मार्फतीने केंद्रस्थानी राहील याची काळजी घेतली. आत्महत्यांची आकडेवारी ठेवणे, ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकत राहील याची काळजी घेणे, प्रसंगी या माध्यमांचा वाटाडय़ा व माहीतगार म्हणून काम करणे, या विषयावर प्रतिक्रिया देण्यात सदैव तत्पर असणे अशी अनेक कामे ते निष्ठेने करतात. भाजप विरोधात असताना आत्महत्यांचा मुद्दा खूप ऐरणीवर आणला गेला. त्या कामात पक्षाला तिवारींची खूप मदत झाली. त्याची परतफेड म्हणून हे मंत्र्याचा दर्जा असलेले पद त्यांना सत्ता येताच देण्यात आले. खरे तर यावर समाधान मानून घेण्यातच तिवारींचे हित होते. मात्र, पदावर येताच त्यांच्या महत्त्वाकांक्षेला नवे घुमारे फुटले. त्यांना आमदार, खासदारकीची स्वप्ने पडू लागली. ती भाजपकडून पूर्ण करणे शक्यच नव्हते. अशी स्वप्ने पूर्ण करायला राजकारणात जातीचे व बेरजेचे गणित महत्त्वाचे ठरते. त्यात तिवारी कुठे बसणारे नव्हते. आपल्याला काहीच मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी युतीची सत्ता असतानाच आदळआपट सुरू केली. त्याकडे माध्यमे सोडली तर कुणी लक्ष दिले नाही. अखेर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपतून सेनेत उडी मारली. राजकारणात याला वातकुक्कुट म्हणतात. तर या तिवारींचे नशीब जोरावर होते. नव्या घडामोडीत सेना सत्तेत राहिल्याने त्यांचे पद कायम राहिले. ज्या पक्षात ते पाच वर्षे होते तो सत्तेविना व आपण सत्तेत या कल्पनेनेच त्यांना हर्षवायू झाला व त्यांनी भाजपविरुद्ध वाक्बाण सोडणे सुरूच ठेवले.

ही टीका जोवर सभ्यतेच्या पातळीवर होती, तोवर कुणी त्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र अलीकडच्या त्यांच्या दोन पत्रातील भाषा व त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीविषयी केलेली शेरेबाजी अशोभनीय ठरावी अशीच आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राजकीय वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या सौ. फडणवीसांना आवरा असे तिवारी म्हणतात. सभ्य व सुसंस्कृत समाजात महिलांविषयी असा शब्दप्रयोग कुणी वापरत नाही याची त्यांना कदाचित कल्पना नसावी. सौ. फडणवीसांची सक्रियता पती-पत्नीच्या संस्कृतीला छेद देणारी आहे, असे अश्लाघ्य विधान तिवारी करतात. शिक्षित व सभ्य असलेल्या नव्या पिढीत व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणे हेच सुसंस्कृतपणाचे लक्षण समजले जाते. पती असो वा पत्नी, एकमेकांच्या या स्वातंत्र्याचा आदर करीत असतील तर तिवारींच्या पोटात दुखण्याचे काही कारण नाही. अशी टीका करून आपण उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरू असे कदाचित त्यांना वाटत असावे. सौ. फडणवीसांची विचारधारा संघाला मान्य आहे का असाही प्रश्न ते विचारतात.  मुळात हे तिवारी संघाचे नाहीत. तसेही ते आता दुसऱ्या पक्षात आहेत. त्यामुळे फडणवीसांचे काय करायचे ते संघ बघेल. त्यात यांनी नाक खुपसण्याचे कारण काय? भाजपने संघाचा गैरवापर सुरू केला आहे, असे हास्यास्पद विधान ते पत्रात करतात. संघपरिवारात कोण कुणाचा वापर करते, हेच जर या भल्या माणसाला ठाऊक नसेल तर त्यांची राजकीय पात्रता किती असेल याची कल्पनाच न केलेली बरी! मुस्लीम आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपला तिवारींनी याच पत्रातून भस्मासूर ठरवून टाकले. पुढे शिवसेनेनेच यावर मतप्रदर्शन टाळत हा मुद्दा थंडयाबस्त्यात टाकला. यातून तिवारींची भाजपवर टीका करण्याची घाई तेवढी दिसून आली.

देवेंद्र फडणवीसांविषयी कुणाचे कितीही मतभेद असतील पण त्यांच्या रूपाने विदर्भाला सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांच्या कार्यकाळात विदर्भात अनेक नवे बदल घडून आले. अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली. अशा वैदर्भीय भूमीशी नाते सांगणाऱ्या फडणवीसांना तिवारी घमेंडी म्हणतात हे सर्वार्थाने अनुचित आहे. तिवारींचा राजकीय वकूब, त्यांचे राजकारणातील स्थान मोठे असते तरी त्यांचे हे आरोप असमर्थनीय ठरले असते.  गेली पाच वर्षे त्यांनी मंत्र्यांचा दर्जा अनुभवला. आत्महत्यांच्या प्रश्नावरून नेहमी सरकारला धारेवर धरणाऱ्याच्या हातातच फडणवीसांनी या समस्येची उकल करण्याची संधी दिली होती. या काळात तिवारींनी काय केले? त्यांच्या कार्यकाळात आत्महत्या कमी झाल्या का? नेमक्या कोणत्या उपाययोजना त्यांनी अंमलात आणल्या? या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले की तिवारींची अकार्यक्षमता ठसठशीतपणे समोर येते. ते मिशनचे अध्यक्ष असताना गेल्या पाच वर्षांत विदर्भात सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आधीच्या तुलनेत हा आकडा अजिबात कमी नाही. आत्महत्यांचे हे दुष्टचक्र कायम राहिले याचाच अर्थ मिशन अपयशी ठरले असा होतो. तिवारी यालाही सरकारच जबाबदार असे म्हणत अंग झटकत असतील तर ते पदावर का चिकटून आहेत? साधारणपणे एखाद्या सरकारची अथवा राज्यकर्त्यांची ध्येयधोरणे पटली नाहीत तर त्यात सामील असलेले लोक पदत्याग करून मग टीका करतात. तिवारींनी ना पद सोडले, ना टीका करणे थांबवले. असे दोन्ही डगरीवर हात ठेवून गेला कार्यकाळ पूर्ण करणारे तिवारी आता कोणत्या नैतिकतेच्या आधारे फडणवीसांना लक्ष्य करतात?

संघ आणि भाजपचे संबंध बरेचदा द्वैत-अद्वैताच्या पातळीवर असतात. ते नेमके कसे हे समजून घेण्यात अनेकांनी हयात घालवली तरीही त्यांना या संबंधातील नेमकेपण कळले नाही. या साऱ्याची कल्पना असलेले तिवारी थेट संघाला पत्र लिहिण्याचा व ते जाहीर होईल याची प्रत्येकवेळी खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो अगोचरपणा ठरतो. संघ अशा जाहीर शेरेबाजीला कधीही प्रतिसाद देत नाही. भाजपने सुद्धा तिवारींची फार दखल घेतलेली दिसली नाही. कदाचित लोकसभा निवडणुकीतील त्यांची ‘कामगिरी’ त्याला कारणीभूत असावी. यामुळे चिडलेल्या तिवारींची भाषा कदाचित जहाल झाली असावी. शेतकरी आत्महत्यांची माहिती गोळा करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ऐनवेळी भगवा पांघरल्याने त्यांचे पदही शाबूत राहिले आहे. त्याचा उपयोग त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करावा. अशी असभ्य भाषा वापरणे विदर्भाची संस्कृती नाही. नव्या मुख्यमंत्र्याशी जवळीक साधण्यासाठी तिवारींनी नवे मार्ग चोखाळावे. अन्यथा, तिवारींनाच आवरा असेच म्हणण्याची वेळ येईल.