‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची दमदार सुरुवात; विभागीय अंतिम फेरीचे दावेदार आज ठरणार

‘डार्लिग’..हा शब्द तसा इंग्रजी. पण, भावनांना भाषेच्या मर्यादा कुठे कळतात? त्या खूप पल्याड असतात. भाषा, प्रांत आणि भौगोलिक सीमारेषांच्या. भावनांची ही हळवी किनार प्रत्येकाच्या आयुष्याला असतेच. तिचा उत्कट परिणाम मात्र ती कुणाच्या तरी देहरूपाशी जुळल्याशिवाय जाणवत नाही. पण, एकदा का ती जाणीव झाली की मग मात्र अंतर्मनाच्या काळोख्या कप्प्यात आपल्याही नकळत एक डार्लिग आकार घेत असते. अर्थात ती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत करलेच, याची मात्र शाश्वती देता येत नाही.  ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्रारंभी सादर झालेल्या ‘डार्लिग’ या नाटकानेही भावनांची हीच अस्वस्थता अतिशय ताकदीने मांडली.

गेल्या दीड महिन्यांपासून महाविद्यालयीन रंगकर्मी ज्याची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ आज शुक्रवारी मोठय़ा उत्साहात झाला. विभागीय अंतिम फेरीच नाही, तर महाअंतिम फेरीकडेच लक्ष ठेवून विद्यार्थ्यांनी गेले काही दिवस तालिम  केली.

नेपथ्यापासून संगीतापर्यंत आणि अभिनयापासून वेशभूषेपर्यंत प्रत्येक पैलूकडे विद्यार्थ्यांनी बारकाईने लक्ष दिल्याचे या स्पर्धेतून जाणवले. आज सादर झालेली दुसरी एकांकिका ‘अतिथी’नेही प्रेक्षकांना अंतर्मुख केले. आयुष्याच्या एका बेसावध वळणावर भेटलेले आगंतुक कसे आपल्या जीवनाचा भाग होऊन जातात आणि त्यांच्या भेटीने अंतर्बाह्य़ बदललेले आयुष्य पुढे कसे भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत राहते, याचे अतिशय सुंदर चित्रण ‘अतिथी’ने सादर केले.

या दोन्ही सादरीकरणानंतर एकमेकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी प्रयोगाचा आनंद साजरा केला. आता प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आणखी एकांकिका सादर होणार आहेत. प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून निवडक एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.  विभागीय अंतिम फेरीतून सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या एकांकिकेला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पर्धेचे ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ हे सहप्रायोजक आहेत. तर, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि एम. के. घारे ज्वेलर्स हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे.

परीक्षकांचा रंगकर्मीशी संवाद

प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवसातील प्रयोग पूर्ण झाल्यानंतर परीक्षकांनी रंगकर्मीशी संवाद साधला. पुढील फेरीसाठी  काही टीप्सही देण्यात आल्या. कलावंत, दिग्दर्शक यांनी घ्यावयाची खबरदारी यावेळी सांगण्यात आली. रंगकर्मीनीही तेवढय़ाच उत्साहाने या सूचनांचा स्वीकार केला.

‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये अनेक वर्षांपासून सहभाग घेत आहोत. दरवर्षी येथे नवीन काही शिकायला मिळते. विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ लोकसत्ताने उपलब्ध करून दिल्याने आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही पुढे येण्याची संधी मिळाली आहे. – नितीन शेगावकर, ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय, उमरेड.

पहिल्यांदाच स्पर्धेतील नाटकात काम करण्याची संधी लोकसत्ता लोकांकिकामुळे मिळाली. ही स्पर्धा खूप मोठी असल्याने सुरुवातीला थोडे दडपण होते. पण, प्रयोग छान झाल्याचा आनंद आहे. पुढील फेऱ्यांसाठी आणखी तयारी करायची आहे. – प्रणीता भट, श्री वसंत शिक्षण महाविद्यालय, नंदनवन.

अभ्यासाव्यतिरिक्त वेगळे व्यासपीठ आणि करिअरचे वेगळे क्षेत्र ‘लोकांकिके’मुळे निवडण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘स्टेज डेअरिंग’, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. स्पर्धेत कोणीतरी जिंकणारच, पण लोकसत्ताचे हे व्यासपीठ बरेच काही शिकवून जाते याचे समाधान आहे. – कीर्ती मलोडे, ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय, उमरेड.

लोकसत्ता लोकांकिकामुळे आमच्यासारख्या नवकलावंतांना संधी मिळाली. लोकसत्ताचे व्यासपीठ हे माझ्यातील कलावंताला उभारी देणारे ठरेल. प्राथमिक फेरीतील अनुभव फार मस्त होता. पुढील फेरीसाठी आणखी जोमाने तयारी करायची आहे. – अभिलाष यादव, श्री वसंत शिक्षण महाविद्यालय, नंदनवन.