News Flash

लेखिका साहित्य संमेलन लिहित्या हातांना बळ देईल

७० टक्के पुरुष आणि ३० टक्केस्त्रिया असे विषम प्रमाण साहित्य संमेलनात नेहमीच असते.

 

  • संमेलनाध्यक्षा अरुणा सबाने यांचा विश्वास
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

साहित्य संमेलनात स्त्रियांची वर्णी तर कमी लागतेच, पण त्याचबरोबर विचारपीठावर देखील स्त्रियांचे प्रमाण कमी राहते. ७० टक्के पुरुष आणि ३० टक्केस्त्रिया असे विषम प्रमाण साहित्य संमेलनात नेहमीच असते. लेखिका साहित्य संमेलनातून स्त्रियांच्या लिखाणाचे प्रमाण वाढेल आणि त्यांच्यात जी काही थोडी भीती आहे, ती कमी होईल. त्यानंतर हे विषम प्रमाण बदललेले दिसेल, असा विश्वास सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष अरुणा सबाने यांनी व्यक्त केला.

लेखिका साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी स्त्रिया, लेखन आणि साहित्य यावर स्पष्ट आणि परखड मते मांडली. अरुणा सबाने म्हणाल्या, स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले, ती अर्थार्जित झाली, रोजगाराभिमुख झाली. मात्र, लेखन-साहित्य हा प्रांत वेगळा आहे. साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली किंवा त्यात आचार्य पदवी घेतली म्हणजे साहित्यिक होत नाही. त्यासाठी प्रसंगांकडे डोळसपणे बघणे, अनुभव घेणे आणि ते लिखाणात उतरणे आवश्यक असते. अजूनही लेखिका निसर्ग, पाऊस, प्रेम यापुढे जात नाहीत कथा, कादंबरी, कवितांमधूनही स्त्री दु:खी, सहन करणारी असेच चित्र रंगवले जाते आणि हे अत्यंत चुकीचे आहे. स्त्रियांवर इतर बाबतीत जसे परंपरागत संस्कार आहेत तसेच ते लेखनाच्या बाबतीतही आहे. म्हणूनच कदाचित वेगळा विषय हाताळण्याचे धाडस करताना त्या दिसत नाहीत. लिहिणाऱ्या स्त्रिया एकाच पठडीत लिहिताना दिसतात. मात्र, काही स्त्रीवादी लेखिकांनी याला फाटा देण्यास सुरुवात केली आहे. प्रभा गणोरकर, मंजूषा सावरकर, सुमती वानखेडे, भाग्यश्री पेठकर, सुनीता झाडे यांच्यासारख्या स्त्रियांनी वेगळे, धाडसी विषय हाताळण्यास सुरुवात केली आहे. तरीही धाडसाने लिहिणाऱ्या स्त्रिया फार कमी आहेत. वेगळे धाडसी विषय घेऊन लिहावे हे अजूनही स्त्रियांना सुचत नाही, कारण अनुभवाला जाऊन त्या भिडत नाहीत. ती हिंमत त्यांना दाखवावी लागेल. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर मी २० वर्षांपूर्वी लिहिले तेव्हा संस्कृती बुडवायला निघाली, असा शेरा मिळाला. आता ही संकल्पना समाजाने स्वीकारली आहे. लेखकाची स्वत:ची भूमिका हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुळातच इतकी गळचेपी होत आहे. अशा वातावरणात लेखकही भयभीत होऊन लिहीत असेल तर तो लेखक आणि सामान्य पुरुष यात फरकच राहणार नाही. एक प्रकाशक म्हणून काम करताना अर्थातच लिखाणाच्या प्रसिद्धीसाठी येणाऱ्या पुरुषाचे प्रमाण अधिक आहे. त्याचवेळी काही घाबरत येणाऱ्या लेखिका सुद्धा आहेत. आपले लेखन घरच्यांनी पाहिले तर काय, अशी भीती त्यांच्या मनात असते. मात्र, लेखिकेने स्वत:साठी, स्वत:च्या समाधानसाठी लिहावे. आपले मत स्पष्ट मांडण्याची ताकद हवी. समाज काय म्हणेल, याचा विचार करून जो लिहितो, ते लिखाण होऊ शकत नाही. आर्थिकदृष्टय़ा त्यांच्यासमोर प्रश्न असतात. कारण लिखाणासारख्या फालतू गोष्टींवर पैसे काय खर्च करायचे, अशी तिच्या घरच्यांची भूमिका असते. अशावेळी आम्ही लिखाणाचा दर्जा पाहतो. तो दर्जा असेल तर आम्ही स्वत: पुढाकार घेऊन ते प्रकाशित करतो. अनुभवाला भिडण्याची ताकद आजच्या पिढीने ठेवली पाहिजे. लेखिका साहित्य संमेलनातून हा बदल निश्चितच होईल, असे अरुणा सबाणे यांनी सांगितले.

कौतुकात हुरळून जाणे योग्य नाही

अलीकडच्या काही लेखिकांबद्दल बोलायचे तर अनेक कवयित्री, लेखिकांनी लिखाणाला बाजारू स्वरूप आणले आहे. काहीतरी लिहायचे आणि लगेच समाजमाध्यमांवर ते टाकायचे. हे लिखाण न वाचता वाहवा देणारे अनेक असतात आणि याच ‘वाहवा’मध्ये त्या हुरळून जातात. खरे तर समाजमाध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकतो. समाजमाध्यमावर आलेल्या लिखाणावर विरोधी मत मांडण्याची आणि ते मांडलेले मत स्वीकारण्याची तयारी असेल तरच लिखाणात सुधारणा होऊ शकते. चांगल्या लेखनासाठी निंदक हवा आणि निंदा सहन करून सुधारण्याची तयारी हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 1:24 am

Web Title: loksatta office visit akp 94
Next Stories
1 पोलिसांच्या वाहनात तरुणाचा मृत्यू
2 जन्मदात्रीकडून २३ दिवसांच्या चिमुकलीची हत्या
3 मेडिकलच्या वॉर्डाचे चक्क आपसात वाटप!
Just Now!
X