गुणवंत विद्यार्थिनींची विद्यापीठाकडून अपेक्षा; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : विदर्भातील विद्यापीठांमध्ये कला, ज्ञान, कौशल्याचा मुळीच अभाव नाही. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आज इतर विद्यापीठांच्या स्पध्रेत विद्यार्थी टीकाव धरू शकत नाही. कारण आपल्याकडील विद्यार्थ्यांसाठी तशी संधीच उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे सुवर्ण पदक देऊन गौरव करताना येथील विद्यार्थ्यांना सोन्यासारखेच बावनकशी प्रोत्साहनही द्या, अशी अपेक्षा विद्यापीठातील ‘सुवर्णकन्यांनी’ व्यक्त केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्यामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या सायली भावे, माधुरी घुगुसकर बोंद्रे, भारती शास्त्री आणि आचार्य पदवी मिळवणाऱ्या डॉ. श्वेता पेंडसे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सुवर्ण पदकाचा खडतर प्रवास, वर्तमान शिक्षण व्यवस्थेतील उणिवा आणि नागपूर विद्यापीठाकडून असलेल्या विविध अपेक्षांवर त्यांनी चर्चा केली. श्वेता पेंडसे म्हणाल्या, विदर्भाशी  दुजाभाव केला जातो असे रडगाणे आपण गात असतो. मात्र, आपल्या उणिवा शोधण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. नागपूर विद्यापीठातर्फे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर विविध कलास्पर्धासाठी चमू पाठवली जाते. मात्र, याची निवड प्रक्रिया, नामांकन या सर्वाची माहिती स्पध्रेच्या आठ दिवसांआधी दिली जाते. आठ दिवसात एखाद नाटक बसवणे  किंवा स्पर्धेसाठी तयार होणे इतके सहज शक्य आहे का?. ‘आविष्कार’सारख्या स्पर्धा इतर विद्यापीठांमध्ये धडाक्यात साजऱ्या होतात आणि नागपूर विद्यापीठात या कधी होतात आणि  संपतात याचा पत्ताही लागत नाही, अशी खंत श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केली. माधुरी घुगुसकर यांनी विद्यापीठात मराठी माध्यमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी पुस्तकेच नसल्याची खंत व्यक्त केली. प्राध्यापकही इंग्रजी माध्यमाला महत्त्व देत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मक भाव वाढतो. त्यामुळे सगळ्या माध्यमांची पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  भारती शास्त्री यांनी सत्रांत परीक्षेवर निशाना साधला. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी केले जात असून त्यांच्या कलागुणांना वावच मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सायली भावे हिने कायद्याचे शिक्षण घेताना आलेल्या समस्यांचा पाढा वाचला. विधि महाविद्यालयामध्ये आजही कालबा झालेले कायदे अभ्यासक्रमाला आहेत. काळानुरूप कायद्याच्या अभ्यासक्रम बदल, विद्यार्थ्यांना पुस्तकी नाही तर प्रात्यक्षिक ज्ञान देणे आवश्यक असल्याचे सायली म्हणाली. याशिवाय वर्तमान शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याच उणिवा असून त्या दूर करण्यासाठी सरकार आणि विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही या सुवर्णकन्यांनी व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेत काही बदल करायचा असेल तर प्राथमिक शिक्षणापासून पुन्हा एकदा ‘छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्’ हे सुरू करावे लागेल. इंटरनेट आणि मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले असून त्यांच्या चिकित्सक बुद्धीचा कस लागत नाही. याशिवाय शिकवणी वर्गामुळे शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षण पूर्णपणे बंद होत असून हा भविष्यातील धोका असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त  केली.  महाविद्यालयीन शिक्षणामध्ये केवळ उपस्थितीवर विद्यार्थ्यांचे आंतरिक गुण न ठरवता त्याच्या गुणात्मकतेवर त्याचा दर्जा ठरवावा असेही त्या म्हणाल्या. एकंदरीत विद्यापीठे आणि शिक्षण व्यवस्थांमध्ये काळानुरूप बदल करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे या चारही विद्यार्थिनींनी सांगितले.

धीर, सातत्य, कामाप्रती समर्पण हवे

छोटय़ा पडद्यावर काम सुरू असताना त्यातून मिळेल तसा वेळ काढून संशोधन पूर्ण केले. असंख्य अडचणी आल्या. एकवेळ तर व्हायवा वेळेत व्हावा म्हणून आठ महिन्यांच्या मुलाला घेऊन विद्यापीठात गेले. अखेर दीक्षांत सोहळ्यात आचार्य पदवी मिळाली. धीर, सातत्य आणि कामाप्रती समर्पणाची भावना हेच यशाचे गमक असल्याची भावना डॉ. श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केली.

गुणात्मक अभ्यासावर भर हवा

सहा सुवर्ण पदके मिळतील असे मुळीच वाटले नव्हते. रोज किमान तासभर  गुणात्मक अभ्यासावर भर दिला आणि यशाचा हा टप्पा गाठता आला. मुळात आपल्याला ज्या अभ्यासक्रमात आवड आहे, ज्यावर आपले प्रेम आहे तेच केले तर यशाचा मार्ग सहज सुकर होतो, असा मंत्र सहा सुवर्ण पदक मिळवणाऱ्या सायली भावे हिने दिला.

ध्येय ठरवले तर यश पक्के

चार किलोमीटरचा पायी प्रवास करून बस पकडणे, कामठीवरून नागपूरला येणे, कॉलेज झाले की नोकरी, असा प्रवास करून मिळेल त्या वेळात अभ्यास केला. या खडतर प्रवासानंतर मिळालेले हे यश आहे. ध्येय ठरवले तर यश नक्कीच मिळते, असे मत चार सुवर्ण पदक मिळवणारी भाग्यश्री शास्त्री यांनी व्यक्त केले

सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा

लग्नानंतर दहा वर्षांनी शिक्षण सुरू केले. त्यातही परीक्षेच्या पंधरा दिवसांआधी सासू वारल्याने परीक्षाच देऊ नये असाही विचार मनात आला. मात्र, पतींच्या विश्वासामुळे परीक्षेला जिद्दीने समोर गेली व आज हे यश मिळाले. मुळात आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कठीण प्रसंगातही तुम्ही यश मिळवू शकता, असे माधुरी घुगुसकर बोंद्रे यांनी सांगितले.