‘वक्ता दशसहस्त्रेषु’च्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीस प्रारंभ

‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत वैदर्भीय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वासाठी रस्सीखेच दिसून आली. काहीही करून स्पर्धेत सहभागी व्हायचेच, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला होता. स्पर्धेचे हे तिसरे पर्व असून जनमानसात पोहोचलेल्या या स्पर्धेत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनीही मोठय़ा संख्येने भाग घेण्यास सुरुवात केल्याचे यावेळी दिसून आले.

गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाण्यातून विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी हजेरी लावली. यंदाही सुमारे दीडशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याने दोन दिवस ही स्पर्धा नागपुरात बोले   पेट्रोलपंपाजवळील विनोबा विचार केंद्राच्या सभागृहात सुरू आहे. ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित, वीणा वर्ल्ड प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बँक ऑफ महाराष्ट्र, दि विश्वेश्वर को-ऑप. बँक लिमिटेड, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट-औरंगाबाद) ‘एमआयटी’चे (औरंगाबाद) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारीला होणार आहे. दरवर्षीच विदर्भातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभतो.

या स्पर्धेत रासायनिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात नावाजलेल्या लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. राजू मानकर अध्यक्षस्थानी होते, तर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रविवारी या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे.

मुलांना एक दृष्टी मिळेल

राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने वैदर्भीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, स्पर्धा महाराष्ट्रभर होत आहे. त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही पुणे-मुंबईतील मुलांसोबत स्पर्धा करण्याची संधी मिळून त्यांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आपल्याही मुलांची त्यातून एक दृष्टी निर्माण होईल आणि येणाऱ्या वर्षांमध्ये ते चांगली तयारी करू शकतील.

– डॉ. राजू मानकर, संचालक, लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्था

 

भाषेकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे

लोकसत्ताने स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. मुलांमध्ये व्यासपीठ धैर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रेरक वातावरण यामुळे निर्माण होते. अपेक्षा एवढीच की, भाषेवरील प्रभुत्वासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यायला हवी. शिवाय, स्पर्धेसाठी निवडलेल्या विषयाला साजेसा आशयही असावा. स्वत:च्या वक्तृत्वाने व्यासपीठ गाजवलेल्या वक्तयांवरील लेख सात दिवस लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले. त्याची कात्रणे करून विद्यार्थ्यांसाठी ती आमच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या विचारांना चांगली चालना मिळते.

– डॉ. मृणालिनी फडणवीस, प्राचार्य, महिला महाविद्यालय

स्थळ- विनोबा विचार केंद्र, बोले पेट्रोलपंपाच्या बाजूला, अमरावती मार्ग

वेळ– रविवार (५ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजता