डोगरगाव, जामठा फाटा, चिचभवन उड्डणपूल धोकादायक 

नागपुरातील  अपघात स्थळे

वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वर्धा मार्ग मृत्यूचा महामार्ग ठरतो आहे. भरधाव येणारी वाहने अनियंत्रित होऊन किंवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांवर धडकून अपघात होण्याचे प्रमाण येथे अधिक आहे. डोंगरगाव, जामठा टी पॉईन्ट आणि चिचभवन उड्डाणपूल ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत.

शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गापैकी वर्धा मार्ग हा एक आहे. नेहमी जड वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. अगदी हैद्राबाद, वर्धा येथून मोठी वाहने याच मार्गाने शहरात दाखल होतात. रस्ता रुंद आणि चौपदरी असला तरी वाहनांची गती हे या मार्गावर होणाऱ्या अपघातासाठी प्रमुख कारण ठरले आहे. या मार्गावर असणारी शाळा, महाविद्यालये, त्यांच्या शेकडो बसेस आणि विद्यार्थ्यांची शेकडो दुचाकी वाहने याशिवाय भरधाव धावणारी खासगी वाहने, जड वाहनांची या मार्गावर चोवीसही तास वर्दळ असते. रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या सव्‍‌र्हिस लेनवर ‘राँग साईड’ ने धावणारी वाहने, रस्त्यावर उभी असणारी वाहने, रस्त्यालगतच्या मार्गावरून मुख्य मार्गावर येण्यासाठी वाहनांची होणारी गर्दी यामुळे येथे नेहमीच अपघात होतात.

नागपूर विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असलं तरी शहरात रस्त्यांची परिस्थिती फारच बिकट आहे. चिचभवन पूल उतरताच मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूचे वाहन दिसत नाही. शिवाय हॉटेल प्राईड चौकात मेट्रोचा खांब मुख्य मार्गाच्या मध्ये झाल्याने दुसऱ्या बाजूची वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला आता एक नवीव जागा मिळाली आहे. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक देशात तिसरा लागतो. देशात गेल्या वर्षांभरात जवळपास २ हजार ३२४ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.

डोंगरगाव

आजवर डोंगरगाव चौकात जवळपास ९ मोठे अपघात झाले असून त्यामध्ये १२ जण जखमी, तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्धा मार्गावरून गुमगावच्या दिशेने हिंगण्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. तेथे वैनगंगा महाविद्यालय आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ या मार्गावर असते. शिवाय गुमगावातील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी बसेस ये-जा करीत असतात. मात्र, हिंगण्याकडून गुमगाव मार्गे वर्धा मार्गावर जाणारी वाहने ‘सर्व्हिस लेन’ चा उपयोग करीत नाही. अशात वर्धेकडून नागपूरकडे भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याच्या एका बाजूने गाव तर दुसऱ्या बाजूने बाजार अथवा मोठी दुकाने आहेत. अशात शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून बस अथवा ऑटो पकडावा लागतो. किंवा शहरातून आल्यावर गावात जाण्यास महामार्ग ओलंडावा लागतो. तेव्हा येथे पादचाऱ्यांसाठी पूल व्हावा अशी मागणी आहे. शिवाय मोक्याच्या आणि घातक वळणावर वाहतूक पोलीस नसतात. केवळ अपघात झाल्यावर ते दिसत असून येथे पोलीस चौकीची मागणीही गावकऱ्यांनी केली.

अपघात का होतात

रस्त्यावर उभी राहणारी वाहने, रस्त्याच्या कडेला भरणारे बाजार आणि त्यामुळे असणारी वर्दळ, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सव्‍‌र्हिस लेनवरून विरुद्ध बाजूने धावणारी वाहने.

चिचभवन उड्डाण पूल धोकादायक

चिचभवन उड्डाण पुलावरील वळण हे सर्वात धोकादायक आहे. या वळणावर दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना विरुद्ध बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत आणि ते पुलाच्या मध्यभागी परस्परांवर धडकतात. अपघातात या उड्डाण पुलाचा पहिला क्रमांक लागतो. या पुलावर अपघातस्थळ असल्याचा फलकही लावण्यात आला असून तो फलक बघण्याच्या नादातही गेल्या काही काळात अनेक अपघात झाले. याच पुलाला पर्याय म्हणून त्याच्याच शेजारी दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन पूल असले तरी हा पूल सुरू राहणार असल्याने अपघाताचे प्रमाण कमी होईल का, याबद्दल मात्र शंका कायम आहे.

अपघात का होतात?

उड्डाण पुलावरील आंधळे वळण अपघातास कारणीभूत ठरते. पुलावरील रस्त्यांची रचना नागमोडी वळणाची आहे. पुलावर नेहमीच बंद असलेले पथदिवे आणि दोन्ही बाजूंनी रात्रीच्यावेळी सुसाट धावणारी वाहने, तसेच अरुंद पूल ही या पुलावर अपघात होण्याची प्रमुख कारणे आहेत.

खापरी ते जामठा फाटा

खापरी ते जामठा फाटा या टप्प्यातही अलीकडच्या काळात अनेक मोठे अपघात झालेले आहेत. नेहमी जड वाहनांची वाहतूक येथूनच होत असल्याने मुख्य मार्गावरून जामठय़ाला जाताना नेमका अपघात होतो. तेथे मोठे कंटेनर डेपो आहे. तेथून ‘सíव्हस लेन’ ने मोठे कंटेनर मुख्य वर्धा मार्गावरील जामठा फटय़ापासून शहराकडे वळतात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. रात्रीच्या वेळी भरधाव छोटी वाहने अपघाताला बळी पडतात. मात्र, येथेही पोलीस चौकी नाही. नागपूरच्या दिशेने समोर आल्यावर डाव्या हाताला स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालय आहे, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल लि मॅरेडियन हॉटेल आहे. हॉटेलकडून सíव्हस मार्गाने वर्धा रोड गाठावा लागतो व तेथेही अपघात होत असतात.

अपघात का होतात

नागपूरहून पुढे जाताना वाहनांना सíव्हस लेनवरून मुख्य मार्गावर येणारी वाहने दिसत नाहीत. नारायणा विद्यालयाच्या सर्व बसेस सíव्हस मार्गाने विरुद्ध दिशेने धावतात. या टप्प्यात काही हॉटेल्स असून त्यांची वाहने रस्त्यावर उभी असतात, रात्रीला ती दिसत नसल्यानेही अपघात झालेले आहेत.

दिवसापेक्षा रात्री अपघाताचे प्रमाण अधिक  

वर्धा मार्गाच्या एकाबाजूने गाव, तर दुसऱ्या बाजूने बाजार अथवा मोठी दुकाने आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून बस अथवा ऑटो पकडावा लागतो. गावात जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. केवळ अपघात झाल्यावर ते दिसत असून येथे पोलीस चौकीची मागणीही गावकऱ्यांनी केली असल्याचे निमजे यांनी सांगितले.’’

– राहुल निमजे, ऑटोचालक