नागपूर : शहरात आणि लगतच्या परिसरात पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत आहे. विहिरी आटल्या आहेत. नळाला पाणी येत नाही. अशा स्थितीत सरकारने सुरू केलेल्या वॉटर एटीएममधून तरी पाणी मिळेल, अशी अपेक्षा लोकांना आहे. मात्र ते सुद्धा दिवसभर बंद राहात असल्याने वाडी भागातील महिला सायंकाळी पाण्यासाठी एटीएमपुढे रांगा लावत आहेत.

वाडी हे शहराला लागून असलेले नगरपंचायतीचे गाव आहे. येथे पूर्वी महापालिकेतून पाणीपुरवठा केला जात होता. आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने ती त्यांची जबाबदारी आहे, असे गृहीत धरून महापालिकेने त्या भागात पाणीपुरवठा करणे बंद केले. त्यामुळे तेथे सध्या कमालीची पाणी टंचाई आहे. मधल्या काळात या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने काविळची साथ पसरली होती. त्यामुळे पर्यायी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्या अपुऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान, शासनाच्यावतीने उद्योगांच्या मदतीने वॉटर एटीएम सुरू करण्यात आले होते. लोकांना शुद्ध पाणी अत्यल्प किंमतीत मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका व्यक्तीला मोजकेच पाणी मिळते. तसा फलकही एटीएमवर लावण्यात आला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती रांगेत उभ्या असल्याचे दिसून आले.