‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

महाविद्यालयीन शिक्षण घेताना स्थानिक सौंदर्य स्पर्धामध्ये भाग घेऊन स्वत:मधील बलस्थानांवर लक्ष दिल्यास फॅशन आणि मॉडलिंग’च्या क्षेत्रात भरपूर वाव आहे. ग्लॅमरच्या या क्षेत्रात येण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब न करता संबंधित एजन्सीच्या माध्यमातून पाऊल टाकल्यास परिश्रम घ्यावे लागत असलेतरी फसगत होण्याची शक्यता संपुष्टात येते, असे मिस इंडिया-२०१३ची उपविजेती लोपामुद्रा राऊत म्हणाली.

मूळची नागपूरची असलेली लोपामुद्रा सध्या मुंबईत राहत असून विविध ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी ती काम करीत आहे. एका शोरूमच्या उद्घाटनासाठी नागपुरात आली असता तिने ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी तिने फॅशन, ग्लॅमर आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर मते मांडली.

मिस गोवा २०१३, मिस इंडिया २०१३ उपविजेता आणि मिस इंडिया २०१४ च्या अंतिम फेरीत पोहोचून सौंदर्याच्या क्षेत्रात ठसा उमटल्यानंतर शांत न बसता तिने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर फॅशन क्षेत्राला करिअर म्हणून निवडले. त्यासाठी ती मुंबईला गेली. आज ती विविध श्ॉम्पू, कपडय़ांच्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग करीत आहे. ‘प्रिन्ट मीडियातील’ जाहिरातीचे तिच्याकडे भरपूर काम आहे. त्याच बरोबर, विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून (गेस्ट अ‍ॅपरन्स) आणि उद्घाटन समारंभालाही तिला देशभरातून निमंत्रित केले जाते. यामुळे तिची ‘सेलिब्रिटी ट्रिटमेन्ट’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यासाठी तिला मानधनही मिळते.

मुंबईतील ग्लॅमरच्या क्षेत्रातील नागपूरची ओळख एक छोटेसे शहर अशी आहे. नागपूरची आहे असे जेव्हा सांगते तेव्हा ऐकणाऱ्यांनाही आश्चर्य वाटते, असे सांगून लोपामुद्राने नागपूर आणि विदर्भातील मुलींना या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या काही टिप्स दिल्या. नागपुरात विविध महाविद्यालयात सौंदर्य स्पर्धा होतात. आंतरमहाविद्यालयीन सौंदर्य स्पर्धाही आयोजित केल्या जातात.

शिवाय विविध सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धा होतात. या स्पर्धा फॅशन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याची पहिली संधी ठरते. या स्पर्धामधील सहभाग आणि प्रत्येक स्पर्धेनंतर स्वत:ला विकसित करण्याची जिद्द असली पाहिजे. व्यक्तिमत्त्व विकास आणि ‘ग्रुमिंग कॅम्प’च्या माध्यमातून देखील या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तयारी केली जाऊ शकते, असे लोपामुद्रा म्हणाली.

सौंदर्यवतींची ब्रँडिंगसाठी आवश्यकता

सौंदर्य स्पर्धेसाठी आवश्यक प्राथमिक गोष्टी माहिती करून त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यास नागपूर, विदर्भातील मुलींना देखील फॅशन आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात नाव कमावता येणे शक्य आहे. प्रत्येक कंपनीला आपली उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सौंदर्यवतींची आवश्यकता आहे. येथील मुलींना अधिकाधिक ‘एक्सपोजर’ कसे मिळेल हे बघावे लागेल. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आणि फॅशनेबल वस्त्र, पादपात्रे, केशरचना यावर खर्च करणे आवश्यक आहे. तसेच बोलण्याची लकब, देहबोली आदी सर्व गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. अभिनय कला शिकण्यासाठी आणि मुंबईत राहण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण घ्यावे लागते. त्याप्रमाणे या क्षेत्रात येण्यासाठी स्वत:ला विकसित करावे लागते आणि स्वत:वर पैसा खर्च करावा लागतो. संपूर्ण तयारी केल्यानंतरही मिस इंडिया किंवा मिस वर्ल्डचा मान मिळाला नाही म्हणून सर्व काही संपून जात नाही. सौंदर्यवती म्हणून नाव आणि पैसा कमवण्यासाठी भरपूर संधी आहेत. जाहिरात क्षेत्र, सदिच्छा दूत, महाविद्यालयात मोटिव्हेशनल कॅम्प घेणे, प्रशिक्षक म्हणूनही करिअर करता येते, असेही लोपामुद्रा राऊत म्हणाली