करोनाच्या भीतीमुळे अनेकांचा बचतीकडे कल

नागपूर : गेल्यावर्षी टाळेबंदीत अनेकांनी वेळ घालवण्यासाठी घरबसल्या विविध प्रकारची ऑनलाईनन खरेदी केली. मात्र यंदा दुसऱ्या टाळेबंदीत लोकांची क्रयशक्ती घटल्याने ऑनलाईन व्यवसायाला ८० टक्के नुकसान झाले आहे. करोनामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलीच तर  पैसा हाताशी असावा, अनेकांनी ऑनलाईनन खरेदीकडे पाठ फिरवली असून ते बचतीला प्राधान्य देत आहेत.

गेल्या मार्च महिन्यात  बाजारपेठेतील दुकाने सुरू असतानाही करोनाच्या भीतीपोटी अनेकांनी दुकानात जाणे टाळले आणि ऑनलाईन वस्तू खरेदी करत वेळ घालवला. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. बाजारपेठा गेल्या एक महिन्यापासून बंद असल्या तरी ऑनलाईन सेवा सुरू असतानाही ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. त्याशिवाय सध्या करोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास लागणारा भला मोठा पैसा हाताशी असावा म्हणून देखील लोकांनी ऑनलाईन खरेदीवर लगाम लावला आहे. त्याशिवाय टाळेबंदीमुळे लाखो लोकांचा रोजगार गेला  आहे. अशात आता प्रत्येक घरात पैशांची बचत सुरू असून केवळ जीवनावश्क वस्तू  खरेदी केल्या जात आहेत. जी वीस टक्के ऑनलाईन खरेदी सुरू आहे त्यामध्ये देखील आरोग्याशी निगडित वस्तू खरेदी केल्या जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या नागरिक केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत. करोनामुळे रुग्णालयात लाखो रुपये लागत असल्याने आपल्यावर जर अशी वेळ आली तर पैसा हाताशी असावा, असा विचार करून लोकांनी ऑनलाईनन खरेदी थांबवली आहे. त्यामुळे हा व्यवसाय ८० टक्के प्रभावित झाला आहे. – बी.सी. भरतिया, राष्ट्रीय अध्यक्ष, कॉन्फ्रिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.