नागपूर : पशु आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंबून रेल्वेने मुंबईला घेऊन जात असतानाचा प्रकार एका पक्षीप्रेमीच्या सतर्कने उघडकीस आला आहे. कोलकाता येथे रेल्वेच्या पार्सल बोगीत पिंजरे चढवल्याची चित्रफित फेसबुकवर टाकून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या मंत्रालयाला कळवले आहे.

हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीत लव बर्ड, कबूतर, पांढरे उंदीर, ससा व  इतर पशुंचे नऊ पिंजरे होते. त्यात सुमारे हजार पशू व पक्षी होते. नागपुरात गाडीत येताच लोहमार्ग पोलीस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सर्व पिंजरे उतरवले. त्यातील सुमारे १०० पशुपक्ष्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली. त्यांच्या कार्यालयाने नागपुरातील मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यर यांना कळवले. तत्पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून नागपुरातील पशु प्रेमींनाही या प्रकाराची माहिती मिळाली. वैद्यर यांनी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफला एक पत्र देऊन या घटनेची माहिती देत मदतीची विनंती केली.  घटनेची गंभीरता लक्षात घेत गाडी येण्यापूर्वीच सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, वनविभाग, पशुवैद्यक, मानद पशु अधिकारी आणि पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी फलाट क्रमांक ८ वर पोहोचले. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस येताच पार्सल व्हॅनमधून पशुपक्ष्यांचे नऊ पिंजरे उतरवण्यात आले. यावेळी पशुप्रेमी संघटनांचे पदाधिकारी करिश्मा गिलानी, मानद पशु कल्याण अधिकारी अंजील वैद्यर उपस्थित होते. सुमारे  एक हजार पशुपक्ष्यांपैकी सुमारे १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यर यांनी दिली. तत्पूर्वी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने नागपूरला येत असलेल्या शुब्रतो दास (३६, रा. कोलकाता) यांनी चित्रफित फेसबुकवर टाकली. उशिरापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.