तब्बल चाळीस रुपयाला एक फूल; समाजमाध्यमांच्या काळातही प्रत्यक्ष गुलाबाचा रोमांच कायम!

नागपूर : आपल्या प्रेयसीला ‘व्हेलेन्टाईन डे’च्या दिवशी अर्थात प्रेमदिनाला गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रेमवीरांच्या खिशाला यंदाही कात्री लागणार आहे. शुक्रवारी प्रेमदिन असल्याने लाल गुलाबाच्या किंमतीत वाढ झाली असून किरकोळ बाजारात एक गुलाब फूल चाळीस रुपयांना मिळत आहे. तर दुसरीकडे समाजमाध्यमांमुळे प्रेमदिनाला थेट गुलाबाचे फूल देण्यापेक्षा त्याचे छायाचित्र, इमोजी आणि आभासी चित्रे फॉरवर्ड करण्याचे फॅड वाढले आहे. पण प्रत्यक्षात लाल गुलाब देण्याचा रोमांच प्रेमवीरांमध्ये अद्याप कायम असल्याचे दिसतो.

आज प्रेम दिवस असल्याने आपल्या प्रेयसी  किंवा प्रियकराला गुलाब फुलासोबतच भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी फूल व बुके विक्रेत्यांना बक्कळ पैसे कमवण्याची संधी मिळते. सध्या फूल बाजारात गुलाबाची आवक वाढली आहे. प्रेमदिवसाला सर्वाधिक मागणी लाल गुलाबाची असते. बाजारात १० रुपये प्रतिनग मिळणारा लाल गुलाबाचा भाव आज २० रुपयांवर गेला आहे. तर किरकोळ विक्रेत्यांनी व्हेलेन्टाईनचे निमित्त साधून लाल गुलाबाचा भाव वाढवला आहे. एक लाल गुलाबाचे फूल ४० रुपयांना विकले जात आहे.  शहराच्या बर्डी येथील नेताजी मार्केटमध्ये सर्वाधिक गुलाबाची फुले बंगळुरू येथून येतात. येथून ही फुले शहारतील किरकोळ बाजारात वितरित केली जातात. मात्र १४ फेबुवारीला प्रेमदिन असल्याने लाल गुलाबांच्या फुलांची मागणी जास्त असते. बंगळुरू येथून येणारा गुलाब  दर्जेदार असल्याने त्याची मागणी जास्त आहे.

हवामानबदलाचा फटका

अवकाळी पावसाचा गुलाब पिकाला फटका पण इतर वेळच्या तुलनेत गुलाबाची आवकही कमी झाली आहे. हवामानाच्या बदल आणि अवकाळी पावसामुळे गुलाबाला फटका बसला आहे. त्यामुळे दर्जेदार गुलाबाच्या किंमती घाऊक बाजारातही वाढलेल्या आहेत. नागपूर जिल्ह्यतूनही काही प्रमाणात फुलांची आवक होते. मात्र यंदाच्या वर्षी ही आवक कमी झाली आहे.

पोलीस सतर्क

व्हेलेन्टाईनच्या आठवडय़ाची सांगता ही १४  फेबुवारीला होत असल्याने या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात तरुणांकडून आततायीपणा होण्याची शक्यता लक्षात घेऊ न साध्या वेशातील पोलीस महाविद्यलय व बसस्थानक परिसरात तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.