तीनजण गंभीर जखमी, कामठीतील थरारक घटना

एका प्रेमीयुगुलाचे घरच्यांचा विरोध झुगारून विवाह केल्यामुळे उद्भवलेल्या भांडणात एकाचा खून करण्यात आला, तर तिघे  गंभीर जखमी झाले. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगढ परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. इकबाल जमिल शेख (३७) रा. रामगढ असे मृताचे नाव आहे, तर शेख अलताफ (३३), शेख जमिल (७०) आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी नवाब रहमान शेख (४५), सलमान नवाब शेख (२०), समीर नवाब शेख (१८), ईस्माईल अजीज खान (३५), रज्जाक अजिज शेख (२८), सईद अजिज खान (३०), जब्बार रेहमु खान, खुर्शिद हुसेन शेख (४५), शेख सिकंदर (२४), फिरोज, नसरू, काल्या ऊर्फ मुस्तफा खान, गोलू, चांद खान, उस्मान खान, नजीर मोहम्मद खान, जहूर खान, शेख अलमी मुस्तफा, शेख शाबीर इब्राहिम, काल्या ऊर्फ मोहम्मद रफीक शेख आणि इतर ६ ते ७ साथीदार यांना आरोपी केले असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

मृताचा भाचा सय्यद इरफान (२३) आणि आरोपी नवाब शेख यांच्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत. विवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध असल्याने २ मार्चला ते दोघेही घरातून निघून गेले व विवाह केला. त्यामुळे मुलीचे नातेवाईक नाराज होते. विवाहानंतर इरफान हा पत्नीला घेऊन आपल्या परिसरातच राहू लागला. सोमवारी रात्री ९.३० वाजता मुलीचे वडील व त्यांच्या नातेवाईकांनी इरफानला भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यादरम्यान रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे शेजारी राहणारे त्याचे मामा व आजोबा यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपीने ऐकून न घेता स्वत:जवळील चाकू व काठय़ांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात इकबाल शेख यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. मात्र, परिस्थिती चिघळू नये म्हणून अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली.