आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यानंतर हल्ला

नागपूर : प्रेमाच्या त्रिकोणातून एका पतीने पत्नी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केली. ही घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत कल्याणेश्वरनगर परिसरात रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे.

किरण कुंवरलाल बरमैया (३५) आणि शिवा (३०) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कुंवरलाल भारत बरमैया (४०) याला अटक केली आहे. आरोपी कुंवरलाल व मृत पत्नी किरण हे मूळचे मध्यप्रदेशातील बालाघाटचे रहिवासी आहेत. शिवा हा दिघोरी परिसरात राहतो. तिघेही जण बांधकाम मजूर आहेत. किरण व कुंवरलाल हे घटस्फोटित आहेत. किरणला पहिल्या पतीपासून चार मुले असून ते बालाघाट येथे राहतात, कुंवरलालही पहिल्या पत्नीपासून दोन मुले असून ते वेगळे राहतात. एका बांधकामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली व सात वर्षांपासून ते पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. काही महिन्यांपूर्वी किरणची शिवा या तरुणाशी ओळख झाली. त्याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याची खबर कुंवरलालला होती. टाळेबंदीनंतर सर्वजण आपापल्या मूळ गावी निघून गेले होते. टाळेबंदी शिथिल होताच महिनाभरापूर्वी ते नागपुरात परतले. कल्याणेश्वरनगरमध्ये एका घरी भाडय़ाने राहात होते. तळमजल्यावर घरमालक व पहिल्या माळ्यावर ते राहायचे. दोन दिवसांपूर्वी किरणने आपला मित्र शिवा यालाही घरी राहायला बोलावून घेतले. रविवारी रात्री तिघेही दारू प्यायले. जेवण करून कुंवरलाल झोपल्यानंतर किरण व शिवा हे शारीरिक संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने उठले व बाजूला गेले. दरम्यान, कुंवरलालला जाग आली. त्याने पत्नी व शिवा यांना आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. त्यानंतर कुऱ्हाडीने दोघांवरही सपासप वार केले. कुंवरलाल तसाच मृतदेहांच्या शेजारी बसून होता.

घरमालकाने ऐकला किंचाळण्याचा आवाज

कुंवरलालने कुऱ्हाडीने वार केल्यानंतर दोघेहीजण किंचाळले. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरमालकाची झोप उडाली. त्याने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. रात्री १ वाजता अजनी पोलीस घटनास्थळ दाखल झाले. खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.