दोघेही प्रियदर्शनी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी

नागपूर : जातीभेदामुळे समाजाने विरोध केल्यानंतर प्रेमीयुगुलाने जगातून निरोप घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपापल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनांनी दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर आणि नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्वेता शिवशंकर यादव (१७) रा. अयोध्यानगर आणि अभिषेक विजय सोनकुसरे (२०) रा. एलआयजी कॉलनी, नंदनवन अशी मृतांची नावे आहेत. दोघेही प्रियदर्शनी तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकत होते.

श्वेता आई व भावासह राहायची. आई घरकाम करीत असून भाऊ सीताबर्डीतील एका दुकानात कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती. रविवारी सकाळी आई व भाऊ घराबाहेर गेले असता ती एकटीच होती. त्यादरम्यान तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आई परतली असता ती गळफास घेतलेली दिसली. पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

तिच्या मृत्यूची माहिती मिळताच दुसरीकडे राहणारा अभिषेक याने रविवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या घरी सिलिंग फॅनला दुपट्टय़ाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील सहकारी बँकेत आरडी एजंट म्हणून काम करतात. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचेही परस्परांवर प्रेम होते. त्यांनी एकत्र जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण, त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. रविवारी त्यांनी काही तासांच्या अंतराने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदनवनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डी. ओ. पेंडकर तपास करीत आहेत.

दहा दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार

दहा दिवसांपूर्वी श्वेता ही प्रियकरासह हुडकेश्वर परिसरातील एका उद्यानात पोलिसांना भेटली होती. त्यावेळी हुडकेश्वर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन घरापर्यंत सोडून दिले होते. तिच्या आईला सर्व हकिगत सांगितली. तिच्या आईने संबंधित मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून श्वेताचा मोबाईल हिसकावला व महाविद्यालयात जाण्यासही निर्बंध घातले.