ऑरेंज सिटी रुग्णालय परिसरातील दंतेश्वरी वस्तीतील एका प्रेमी जोडप्याने घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शरद सतीश गेडाम (२५) आणि बरखा सुभाष सिरसाठ, अशी मृत प्रेमीयुगलाची नावे आहेत. दोघे एकमेकांचे मित्र होते. विवाह न करताच एकत्र राहत असताना त्यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.
वडिलांचे निधन झाल्यानंतर शरद दंतेश्वरी झोपडपट्टीत आई शारदा आणि बहीण सुजाता यांच्यासोबत राहत होता. बरखा ही मध्यप्रदेशातील सारणीतील रहिवासी होती. ती नागपूरला एअरहोस्टेसच्या प्रशिक्षणासाठी आलेली असताना सुरुवातीला ती वसतीगृहात राहत होती. शरद आणि बरखा यांची कार्यक्रमानिमित्त ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. बरखा वसतीगृहात राहत असताना शरद तिला आपल्या घरी घेऊन आला आणि अनेक दिवसांपासून दोघे एकत्र राहत होते. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री शरद आणि बरखा एका विवाह समारंभात गेले. तेथून रात्री ११ वाजता दोघे घरी परतले आणि आपल्या खोलीत गेले. रात्री ११.३० वाजता शरदने लहान बहिणीला पेन मागितला आणि खोलीत गेला. दोघे आपल्या खोलीत जास्तीतजास्त वेळ राहत असल्यामुळे आई आणि बहीण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हते, त्यामुळे रविवारी सकाळी त्यांनी लक्ष दिले नाही. आई शारदा काही कामानिमित्त बाहेर गेली आणि बहीण सुजाता परिसरातील मैत्रिणीसोबत बाहेर गेली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास दोघांची कुठलीही हालचाल नाही किंवा आवाज येत नसल्यामुळे बहिणींने आवाज दिला. मात्र, कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका आली. सुजाताने खिडकीतून खोलीत बघितले तर शरद आणि बरखा यांनी ओढणीने गळफास लावल्याचे दिसून आले.
शेजाऱ्यांना माहिती दिल्यावर त्यांनी शरदच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि त्यांना खाली उतरविले. ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धंतोली पोलीस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी खोलीत तपासणी केली असता चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. शरदसोबत राहत असताना आपली घरची मंडळी आपल्याला स्वीकारणार नाही, हे बरखाला माहिती होत,े त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद नोकरी करीत होता. त्यांच्या मित्रांशी संवाद साधला असताना दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. सामाजिक कार्यात तो सहभागी होत असे. मात्र, त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, हे मात्र कोडेच असून पोलीस तपास करीत आहेत.