* ‘बीसीयूडी’ संचालकांच्या महाविद्यालयाचे मूल्यांकन कधी?
* केवळ दोन संलग्नित महाविद्यालये मूल्यांकनास इच्छुक
महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन (एए) करणार पण त्याची सुरुवात माझ्या महाविद्यालयापासून करणार अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या महाविद्यालये व विद्यापीठ मंडळाचे (बीसीयूडी) संचालक डॉ. दिनेश अगरवाल यांना संलग्नित महाविद्यालयांकडून अल्प प्रतिसाद मिळाला असून ३१ जुलैपर्यंत केवळ दोन महाविद्यालयांनी शैक्षणिक मूल्यांकन करण्याची उत्सुकता दर्शवली आहे. संचालकांच्या महाविद्यालयाचे मूल्यांकन होणार कधी? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेले आणि विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणांवर अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. अगरवाल यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात ‘बीसीयूडी’ संचालकपदाची सूत्रे स्वीकारली. नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी ‘लोकसत्ता’शी बोलताना डॉ. अग्रवाल यांनी ३० वर्षांच्या सेवेचे फळ मिळाल्याचा अत्यानंद व्यक्त करून भविष्यात महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचा विषय हाताळणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यावर महाविद्यालयांचे मूल्यमापन करणाऱ्या अगरवालांनी आधी स्वत:चे मूल्यमापन करावे, अशा तिखट प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
वर्षभर शैक्षणिक मूल्यांकनाच्या मागे लागून डॉ. अगरवाल यांनी दिशानिर्देश बनवले आणि विद्यापीठाकडून शैक्षणिक मूल्यांकन करून घ्या, असे आवाहन केले आहे. मात्र, त्यांच्या आवाहनाला संलग्नित महाविद्यालयांपैकी दोन महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला आहे. शहरात सर्वात जास्त संलग्नित महाविद्यालये आहेत. मात्र, मूल्यांकनास इच्छुक असलेली दोन्ही महाविद्यालये नागपूर बाहेरची आहेत. त्यात गोंदियाचे एस.एस गर्ल्स महाविद्यालय आणि वर्धेचे जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनी ३० हजार रुपये शुल्कही भरले आहे. त्यानुसार महाविद्यालयांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्याची तयारी ‘बीसीयूडी’ करीत आहे. त्यात अंतर्गत आणि बाह्य़ तज्ज्ञ असलेली समिती नेमून ‘बीसीयूडी’ मूल्यांकन करणार आहे. मात्र अद्यापही ‘बीसीयूडी’ संचालक ज्या महाविद्यालयातून आले त्या वर्धेच्या बापूसाहेब देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मूल्यांकन केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

क्लिष्ट प्रक्रियेमुळे विलंब
वर्धा आणि गोंदिया येथील दोन महाविद्यालयांनी शैक्षणिक मूल्यांकनाची तयारी दर्शवली आहे. पण, माझे वध्र्याचे बापूसाहेब देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयही शैक्षणिक मूल्यांकन करेल. अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे. त्यामुळे उशीर होतोय. लवकरच अंतर्गत आणि बाह्य़ तज्ज्ञ असलेली समिती नेमून त्या महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात येईल. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेसमोर समितीचा अहवाल गेल्यानंतरच त्यांना अ,ब,क,ड..कोणती श्रेणी द्यायची ते ठरेल. विद्यापीठाच्या जवळपास ६०० महाविद्यालयांपैकी चांगल्या पायाभूत सुविधा असलेल्या निवडक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून शैक्षणिक मूल्यांकन करून घ्यावे, यासाठी स्वत: टपाल (मेल) करणार आहे. तसेच या मूल्यांकनाचे फायदेही कळवणार आहे.
– डॉ. दिनेश अगरवाल, संचालक, ‘बीसीयूडी’