परिवहन कार्यालयांत जाणाऱ्यांचीच संख्या अधिक   

महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी  परिवहन खात्याने १४ जून २०२१ पासून  घरबसल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन परवाने देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु प्रत्यक्षात असे परवाने घेणाऱ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष परिवहन कार्यालयांत (आरटीओ) जाऊन परवाने घेणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे.

या सुविधेसाठी परिवहन खात्याने राष्ट्रीय सूचना केंद्राकडून वाहन व सारथी ४.० या संगणकीय प्रणालीत बदल करून घेतले. त्यानंतरच्या राज्य परिवहन खात्याच्या सारथी संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, १४ जून ते १२ जुलै २०२१ पर्यंत २ लाख ५९ हजार ९९७ उमेदवारांना शिकाऊ परवाने दिले गेले. त्यातील ५१ हजार २७ उमेदवारांनी ऑनलाईन परवाने घेतले. हे प्रमाण केवळ २० टक्केच दिसत आहे.

याबाबत परिवहन उपायुक्त (संगणक) संदेश चव्हाण म्हणाले, ऑनलाईन  शिकाऊ परवाना पद्धत नवीन असल्याने प्रतिसाद कमी दिसत आहे. परंतु कालांतराने ही संख्या वाढेल. नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे म्हणाले, शासनाने घरबसल्या शिकाऊ परवाने देणे सुरू केल्यावर ग्रामीणमध्ये  प्रत्यक्षात परवान्यासाठी येणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

येथे  चांगला प्रतिसाद आहे. परंतु काही कार्यालयांत प्रतिसाद कमी  जाणवत आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव म्हणाले, शहर व पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयांत शिकाऊ परवान्यांसाठी येणाऱ्यांची संख्या किंचित कमी  असली तरी मोठय़ा संख्येने उमेदवार येत आहेत. परंतु पुढे ही संख्या कमी होऊ शकते.

..तर कायम परवान्यासाठी  झुंबड!

आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवाना घेण्यासाठी ऑनलाईन वेळ घ्यावी लागते. प्रत्येक कार्यालयात एवढय़ाच उमेदवारांना वेळ देण्यासाठीची संख्याही निश्चित आहे. परंतु घरबसल्या रोज कितीही संख्येने  परवाने घेता येतात.  काही कार्यालयांत शिकाऊ परवाने घेणारे अधिक झाल्यास तेथे कायम परवाने घेण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. परंतु  घरबसल्या परवाने देणे सुरू झाल्याने  कर्मचारी कमी लागतील. सोबतच आता नवीन वाहने नोंदणीपूर्वी वाहन तपासणीची गरज नाही. त्यामुळे  मनुष्यबळ कमी लागेल. हे मनुष्यबळ कायम परवान्यांसाठी वापरून यावर तोडगा शक्य असल्याचा दावा संबंधितांनी केला.