एका फटक्यात ७६ रुपयांची दरवाढ

नागपूर : विधानसभा निवडणुका होताच नागपुरात सिलेंडरचे दर तब्बल ७६ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता १४.२ किलोचे घरगुती सिलेंडर ७२६ रुपयांवर पोहचले आहेत. सलग चार महिन्यांपासून सिलेंडर दरवाढ  सुरू असून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान १०५ रुपयांनी सिलेंडर महागले. त्यामुळे सर्वसामन्यांना चांगलाच फटका बसला आहे.

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. अजून नवे सरकार स्थापन झालेले नाही. मात्र राज्यात केंद्र सरकारने सिलेंडर दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दरमहिन्याला सिलेंडरची दरवाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात १४.२ किलोचे घरगुती सिलेंडरचे दर १०५ रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ५० रुपये तर ऑक्टोबरमध्ये ७६.५० रुपयांनी दर वाढले. आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरचे दर ७६ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने रॉकेल पुरवठा बंद करून गरिबांना गॅस सिलेंडरकडे वळवले आहे. मात्र त्यांना हे दर परवडणारे नसल्याने अनेक झोपडय़ांमध्ये पुन्हा चुली पेटायला लागल्या आहेत.

उज्ज्वला गॅस योजना देखावाच ठरली 

दारिद्र रेषेखालील महिलांना चुलीपासून मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना आणली. मात्र या योजनेचा जिल्ह्य़ात फारसा लाभ मिळाला नाही. अनेकांनी शंभर रुपये देऊन पहिल्यांदा सिलेंडर घेतले. मात्र त्यानंतर ते शोभेची वस्तू बनले. २८३ रुपयांच्या अनुदानातही घट झाली असून सध्या ते २२६ रुपयांवर आले आहे.

व्यावसायिक सिलेंडर ११९ रुपयांनी महागले

१९ किलोचे व्यावसायिक सिलेंडरही ११९ रुपयांनी महागले आहेत. गेल्या चार महिन्यांत १९४ रुपयांची वाढ झाली आहे. हे सिलेंडर १ हजार ३२० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

जनतेची लूट

मोदी सरकारने निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात खर्च केला. तो भरून काढण्यासाठी सरकार आता सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम करत आहे. गेल्या चार महिन्यांपासून सिलेंडरची दरवाढ सुरू असून ही राज्यातील जनतेची लूट आहे.

– वैशाली कडाव, गृहिणी, ओंकारनगर

सिलेंडर दरवाढीमागे अनेक कारणे असू शकतात. याचे अुनदान  शासनाकडून ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. ती एका प्रकारची बचत आहे. काँग्रेसच्या राजवटीत देखील सिलेंडर दरवाढ झाली होती.

– अर्चना डेहणकर, प्रदेश प्रवक्ता, भाजपा.

गेल्या चार महिन्यातील दर

ऑगस्ट – ६२१.०० रु.

सप्टेंबर – ६३७.०० रु.

ऑक्टोबर -६५०.०० रु.

नोव्हेंबर – ७२६.५० रु.