नागपूर: छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून शुक्रवार, १० जानेवारीला रात्री १०.३७ मिनिटांनी दिसणार आहे. या चंद्रग्रहणाला ‘वोल्फ मून एकल्प्सि’ असे म्हणतात. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, पूर्व साऊथ आफ्रिका येथेही दिसेल. यावर्षीचे हे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण असून यावर्षीचे चारही चंद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असतील. विदर्भात ग्रहणाची सुरुवात रात्री १०.३७ मिनिटांनी होईल. ग्रहण मध्य १२.४० मिनिटांनी तर ग्रहण समाप्ती २.४२ मिनिटांनी होईल. ग्रहण साध्या डोळ्याने फारसे चांगले दिसणार नाही, पण मोठी द्विनेत्री किंवा दुर्बिणीने पृथ्वीची सावली पाहता येऊ शकेल. या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने चंद्रबिंब तेजस्वी आणि २.६ टक्के मोठे दिसेल. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते, पण छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही. खगोलप्रेमींनी या ग्रहणाचे निरीक्षण करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपतर्फे करण्यात येत आहे.