१५ मिनिटांत पत्रकार परिषद गुंडाळली

मोदी सरकारने तीन वर्षांत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी नागपुरात आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची विकासकामे आणि इतर मुद्दय़ांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तारांबळ उडाली. त्यामुळे १५ ते २० मिनिटांतच पत्रकार परिषद अक्षरश: गुंडाळावी लागली.

काही पत्रकारांनी अकबर यांना गाठून विजय मल्या, मध्य आशियात सुरू असलेला तणाव आणि त्याचा भारतावरील परिणाम या विषयावर विचारणा केली असता त्यावरही त्यांनी अधिक बोलणे टाळले. विजय मल्याच्या प्रकरणावर त्यांनी ‘ब्रिटिश कायद्यांची आपणास माहिती नाही’, यासंदर्भात परराष्ट्र  मंत्रालयाचे प्रवक्ते काय ते सांगू शकतील, असे उत्तर दिले तर मध्य आशिया देशातील घडामोडी हा संवेदनशील विषय असल्याने यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

निश्चलनीकरणानंतर घटलेला विकास दर, जमा झालेल्या काळ्या पैशाचे प्रमाण, त्याची बँकांकडून न मिळणारी माहिती, फोफावणारा दहशतवाद आदी बाबींवर अकबर म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँक आकडे गोळा करीत आहे. निश्चलनीकरणानंतर एक कोटी नवीन करदाते जुळले आहेत. दहशतवाद्यांवर भारत कोणताही समझोता करणार नाही.  तीन वर्षांतील केंद्र सरकारच्या विकासाची आकडेवारी देण्याची मागणी अकबर यांच्याकडे केली असता, ती संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गोमांस बंदी हा राज्य सरकारचा विषय असून संबंधित राज्य त्यांच्या खाद्य संस्कृतीनुसार निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.