मंगेश राऊत

महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा कल्लू अद्याप फरारच

एकेकाळी ट्रकचालक असलेला कल्लू खान गेल्या पाच वर्षांत वाळू माफिया म्हणून उदयास आला असून त्याने वाळू तस्करीच्या माध्यमातून कोटय़वधींची माया जमवली आहे. काही दिवसांपूर्वी खरबी मार्गावर महसूल अधिकाऱ्यांवर झालेला हल्लाही त्यानेच केला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पण, अद्यापही त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

मोहम्मद इमानुल खान ऊर्फ कल्लू खान असे त्याचे नाव आहे. तो मूळचा झारखंड राज्यातील रांची येथील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी तो ट्रकचालक होता. ट्रक चालवत असताना तो नागपुरात आला. खरबी मार्गावरील नॅशनल ढाब्याशेजारी असलेले एआर ट्रान्सपोर्टचे मालक झाकीर भाई यांच्याकडे तो काम करायचा. त्यानंतर तो वाळू तस्करी करणारे ट्रक चालवू लागला. कालांतराने तो स्वत: वाळू तस्करीच्या धंद्यात शिरला. गेल्या पाच वर्षांत त्याने सात ते आठ टिप्पर खरेदी केले. वाळू घाट बंद असतानाही भंडारा जिल्ह्य़ातील पवनी येथे पंचभाई आणि नागपुरातील हटवार नावाच्या व्यक्तीशी मिळून त्याने उपराजधानीत वाळू तस्करीला सुरुवात केली. महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच तो वाळू माफिया झाला. २३ एप्रिलला सकाळी महसूल अधिकाऱ्यांचे पथक खरबी मार्गावरून जात असताना दोन ट्रकमध्ये वाळू भरलेली दिसली. त्या ट्रकचालकांना थांबवून त्यांच्याकडून रॉयल्टी मागण्यात आली. ट्रक चालकांनी रॉयल्टी पावती नसल्याचे सांगून मालक कल्लू खान याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कल्लू खान एमएच-४१, एए-८१०० क्रमांकाच्या मर्सिडिज बेंझने तेथे पोहोचला. त्याने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून ट्रक पळवले व स्वत:ही पळून गेला. याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण, ट्रक कुणाच्या मालकीचे होते व मर्सिडिजमध्ये कोण होता, याचा सुगावा लागत नव्हता. शेवटी नंदनवन पोलिसांनी खरबी ते पारडी रस्त्यावरचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मर्सिडिजमध्ये कल्लू खान दिसला. महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू माफिया झालेला कल्लू आज त्यांच्याच जीवावर उठला आहे. त्याच्या वेळीच मुसक्या आवळणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पवनी पोलीस ठाण्यात एक गुन्हा

वैनगंगा नदीच्या पवनी येथील घाटावरून कल्लू हा वाळू तस्करी करतो. तेथून वाळू तो नागपुरात आणतो. वाळू तस्करीच्या वादातून त्याच्यावर पवनी येथे एक गुन्हा दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने पवनीमध्ये एका स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर बंदूक उगारली होती. पण, त्या अधिकाऱ्याने तक्रार दिली नाही, अशी माहिती नंदनवन पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. पण, आता नंदनवन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धोनीच्या बंगल्यासमोर कोटय़वधींचा भूखंड

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या रांचीतील आलिशान बंगल्यासमोर कल्लूने सहा हजार चौरस फुटाचा भूखंड नुकताच खरेदी केला आहे. त्याशिवाय खरबी परिसरात त्याचा आलिशान बंगला असून परिसरात एका भूखंडावर तो वाळू साठवून ठेवतो. त्याची वाळू पडलेली असताना महसूल अधिकारी कोणतीच कारवाई करीत नाही, हे विशेष.

तस्करीद्वारे साठवलेली वाळू, दुसऱ्या छायाचित्रात महसूल अधिकाऱ्यांनी २३ एप्रिलला अडवलेले ट्रक दिसत असून कल्लूने त्यांचे क्रमांक बदण्याचा प्रयत्न केला.