News Flash

सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल होताच हल्लाबोल थंडावला!

शेकडो आमदारांचा एकच प्रश्न

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नावरून सरकारविरोधात हल्लाबोल करणाऱ्या विरोधकांनी, मंगळवारी सिंचन घोटाळ्यात आणखी काही प्रकरणात गुन्हे दाखल होताच तलवारी म्यान कल्याने विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. सभागृहाबाहेर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांनी विधानसभेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास होकार देत समझोत्याची भूमिका घेतली. विधान परिषदेत मात्र बहुमताच्या ताकदीवर विरोधकांनी आजही कामकाज रोखले. मात्र उद्यापासून तेथेही कामकाज सुरळीत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली होती. मात्र या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यांतरही शेतकऱ्यांचे सातबारा अजून कोरे झालेले नाहीत. कर्जमाफी प्रकरणात सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सरकारविरोधात जन आक्रोश हल्लाबोल आंदोलन छेडले होते. मंगळवारी विरोधी पक्षांच्या मोर्चातही शेतकऱ्यांची संपूूर्ण कर्जमाफी आणि सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय हे हल्लाबोल आंदोलन थांबणार नाही असे विरोधकांनी स्पष्ट केले होते. कर्जमाफीसाठी सरकारविरोधात असहकार पुकारण्याचेही विरोधकांनी जाहीर  केले होते. याच रणनीतीनुसार विरोधकांनी गेले दोन दिवस उभय सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते. सिंचन घोटाळ्यात अजूनही काही गुन्हे दाखल होणार असून विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचा गर्भित इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला होता. त्यानंतरही हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत विरोधकांनी सरकारला आव्हान दिले होते. मात्र या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच सिंचन घोटाळ्यात आणखी काही प्रकरणात गुन्हे दाखल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आणि अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज समझोत्याची भूमिका घेतल्याचे चित्र विधानसभेत दिसले. गेल्या दोन दिवसांपासून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेऊन कामकाज रोखणाऱ्या विरोधकांनी आज मात्र काहीशी सबुरीची भूमिका घेतल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले. प्रशोत्तराच्या तासात सुरुवातीस काही काळ घोषणाबाजी केल्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरील स्थगन प्रस्ताव आणि बोंडअळीवरील लक्षवेधीवरून काही काळ सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधक शांत झाले.

शेकडो आमदारांचा एकच प्रश्न

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत विधानसभेत पाच दहा नव्हे तर तब्बल १०० हून अधिक आमदारांनी लेखी प्रश्न विचारला होता. त्यावर ५ डिसेंबपर्यंत १३.४९ लाख शेतकऱ्यांना ८६१०.६३ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी संबंधित बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तरात सांगितले. विशेष म्हणजे सध्या कारागृहात असलेले छगन भुजबळ यांनीही याच विषयावर प्रश्न विचारला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:55 am

Web Title: maharashtra acb files firs in maharashtra irrigation scam
Next Stories
1 मुंबै बँक कर्ज घोटाळ्याचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी
2 विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी
3 विद्यार्थिनीला शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
Just Now!
X