* चंद्रपूरला सैनिकी शाळा ’ विदर्भातील कृषीपंपाचा अनुशेष दूर होणार

* यवतमाळ-वर्धात इस्रायली तंत्रज्ञानाने सुक्ष्म सिंचन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भातील चंद्रपूरला सैनिकी शाळा, मिहानला १०० कोटींसह विविध प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणावर निधी मिळाला आहे. विदर्भातील दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांनाही मोठय़ा प्रमाणावर निधीसह यवतमाळ व वर्धा जिल्ह्य़ात इस्रायली तंत्रज्ञानाने सुक्ष्म सिंचन योजना व कृषीपंपाकरिता मोठय़ा प्रमाणात निधीही अर्थसंकल्पात मिळाल्याने विदर्भाला लाभ होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहानला १०० कोटी मिळाल्याने येथे उद्योग वाढून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची आशा आहे. मराठवाडय़ातील ४ हजार व विदर्भातील १ हजार गावे दुष्काळापासून संरक्षित करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने ४ हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा झाल्याने विदर्भाला चांगला निधी मिळेल. मुंबई- पुणे- नागपूर मेट्रोकरिता ७१० कोटी प्रस्तावित झाल्याने नागपूरच्या वाटय़ाला चांगला निधी येईल. कृषीपंप जोडणी व विद्युत पायाभूत सुविधा अंतर्गत राज्यात ९७९ कोटींची तरतूद असल्याने विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्य़ातील कृषीपंपाचा अनुशेष दूर होण्यास मदत होईल.

मुंबई, नागपूर, औरंगाबादच्या विधि विद्यापीठाला ३९.२८ कोटी मिळाल्याने येथील पायाभूत यंत्रणा सक्षम होईल. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात तीन रेल्वे प्रकल्प होणार असून त्याकरिता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी तयार होणार आहे. त्याला १५० कोटी रुपये प्रस्तावित केल्याने विदर्भातील वर्धा- यवतमाळ- नांदेड आणि वडसा देसाईगंज, गडचिरोली या प्रकल्पाला गती मिळेल.

मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना वीज दरात सवलतीकरिता १ हजार कोटी मिळणार असल्याने सर्वाधिक लाभ विदर्भाला होईल. सर्वाधिक आत्महत्याग्रस्त यवतमाळ व वर्धा जिल्ह्य़ात इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून सुक्ष्म सिंचनाकरिता १०० कोटी प्रस्तावित करून नवीन योजना राबवल्या जाईल.

विदर्भातील नवेगाव- नागझिरा, पेंचसह राज्यातील इतर वाघ्र प्रकल्पाकरिता अर्थसंकल्पात ८० कोटी रुपये प्रस्तावित आहे. सोबत गांधी जयंतीला १५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे सेवाग्राम परिसराच्या विकासाकरिता अर्थसंकल्पात तब्बल ९३.८० कोटी रुपये प्रस्तावित आहे. २६६.५३ कोटींच्या या प्रकल्पाकरिता गेल्या वर्षी २५ कोटींचा निधी मिळाला होता. शासनाकडून आणखी निधी मिळाल्याने विदर्भातील पर्यटन वाढीला मदत मिळण्याची आशा आहे.

नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिटय़ूटवर संभ्रम

सामाजिक न्याय विभागाकडून नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिटय़ूटकरिता निधीची घोषणा अर्थसंकल्पात होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. परंतु अर्थसंकल्पात निधीबाबद स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाले आहे.