ऐनवेळी नवीन मागणी आल्याने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात

नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु पटोले यांनी ऐनवेळी अध्यक्षपदासोबतच मंत्रीपद देण्याची मागणी केल्याने पक्षाने प्रदेशाध्यक्षाची घोषणा रखडल्याची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये  मंत्रीपद आहे. तसेच ते काँग्रेसचे विधिमंडळ नेते आहेत. त्यांनी स्वत: प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षाचे प्रभारी आणि वरिष्ठ नेत्यांचे मत जाणून घेतल्यानंतर नाना पटोले यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली. त्यांच्या नावाच्या घोषणेची  केवळ  औपचारिकता शिल्लक आहे. पण, ऐनवेळी पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद  हवे असल्याचे पक्षाला कळवले. अचानक आलेल्या या मागणीने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात पडले असून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा प्रलंबित ठेवण्यात आली आहे, असे पटोले यांच्या विश्वासू सूत्रांनी सांगितले. गेल्या  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठी झळ बसली आहे. त्यातून पक्ष उभा करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष  हवा आहे. त्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि आमदार यांच्याशी फोनवरून साधून चर्चा केली.  आमदारांशी चर्चा करताना एच.के. पाटील यांनी ओबीसी नेत्यावर अधिक भर दिल्याचे समजते.  घडले देखील तसेच. पटोले यांचे नाव आघाडीवर आले. सोबतच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार राजीव सातव यांचीही नावे चर्चिले गेली. परंतु पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा आक्रमक प्रचार केला तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवडणुकीच्या रिंगणात आव्हान दिले होते. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आणि त्यांचे ओबीसी असणे या दोन बाबी त्यांच्या पथ्यावर पडल्या.  एक-दोन दिवसात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत होते. मात्र, पटोलेंच्या मंत्रीपदाच्या मागणीने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात पडले असून प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा तूर्तास थांबण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाबाबत केवळ माध्यमांत चर्चा आहे. अध्यक्ष बदलायचा निर्णय योग्यवेळी होईल.

 सचिन सावंत, प्रवक्ता, काँग्रेस.