गडचिरोलीतील घटनेस वेगळे वळण दोन पीडित मुलींनाही ताब्यात घेतले

गडचिरोलीतील दोन मुलींवरील कथित बलात्कार प्रकरणाला शनिवारी वेगळेच वळण लागले असून गडचिरोली पोलिसांवर बलात्काराचा आरोप लावणारे सामाजिक कार्यकर्ते सैनू गोटा व त्याची पत्नी शीला गोटा यांना गडचिरोली पोलिसांनी नागपुरातून अटक केली, तर पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एका वकिलाच्या कार्यालयात झाल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

२१ जानेवारीला अनुक्रमे २२ आणि ३२ वर्षांच्या दोन मुली छत्तीसगढ सीमेवरील जुनवारा गावाकडून नैनाळाकडे जाताना पोलिसांच्या सी-६० पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले व गावाचे नाव खोटे सांगितले. त्यामुळे पोलिसांना त्या नक्षल समर्थक असल्याचा संशय आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पोलिसांवर मुलींवर बलात्कार करण्याचा आरोप झाला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आईसमक्ष मुलींची वैद्यकीय तपासणी केली. मात्र, तपासणी अहवालात अत्याचार झाल्याचे समोर आले नाही.  दरम्यान, मुलींचा भाऊ गिल्लू रामगोटा याने मुलींना हजर करण्यात यावे म्हणून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. मात्र, ती अद्याप सुनावणीला आलेली नाही. दरम्यान, २५ जानेवारीला मुली आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. परिस्थिती बदलल्याने मुलीसह गडचिरोलीतील सामाजिक कार्यकर्ता सैनू गोटा, त्याची पत्नी शीला गोटा शुक्रवारी नागपुरात दाखल झाल्या. शनिवारी दुपारी त्या झिरो माईल चौकातील अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्या कार्यालयात बसले असताना गडचिरोली पोलीस धडकले आणि त्यांनी सैनू गोटा, शीला गोटा यांना अटक करून दोन मुलींना ताब्यात घेतले.

यानंतर अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन पीडित मुलींसह दोघे आपल्या कार्यालयात बसून होते. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यासाठी मुलींवर नेमका कशाप्रकारे अत्याचार झाला, याची चौकशी सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी कोणतेही ओळख न सांगता त्यांना बळजबरीने पकडले. पोलिसांनी पीडित मुलींना अशाप्रकारे वागणूक देणे योग्य नसून एका वकिलाच्या कार्यालयात घुसून, अशी कारवाई करणे हे लोकशाहीवर घाला आहे.

दाम्पत्याकडून अपप्रचार

या मुली संशयास्पद स्थितीत जंगलात सापडल्या होत्या. त्यांची चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मुलींच्या आईसमोर झालेल्या वैद्यकीय चाचणीत त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले नाही. दरम्यान, सैनू गोटा आणि शीला गोटा यांनी जाणीवपूर्वक पोलिसांकडून मुलीवर बलात्कार झाल्याचा अपप्रचार केला, असा कबुलीजबाब मुलींनी पोलिसांना दिला आहे. या आधारावर गोटा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्य़ात त्यांना अटक करण्यासाठी त्यांचा मागोवा घेतला तेव्हा ते नागपुरात असल्याची माहिती मिळाल्यामुळे नागपुरात त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यासोबत साक्षीदार मुली असल्याने त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले.  सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली.