पोलीस महासंचालकांचा गडचिरोली-गोंदिया पोलिसांना आदेश; एएनओत निवडणुकीपूर्वी आढावा बैठक

नागपूर : कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवल्याने १५ जवान शहीद झाले होते. या घटनेचा प्रतिशोध घेण्याची वेळ आली असून गडचिरोली व गोंदिया पोलिसांनी त्यासाठी सज्ज व्हावे. विधानसभा निवडणुकीच्या काळात नक्षलवादी पोलिसांवर हल्ले करण्याची योजना आखतील. त्यापूर्वीच पोलिसांनी नक्षलवाद्यांची योजना हाणून पाडावी व सडेतोड उत्तर द्यावे, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरुवारी दिले.

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून केव्हाही आचारसंहिता लागू करण्यात येऊ शकते. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून विविध योजना आखण्यात येत आहेत. पण, राज्याच्या पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान हे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ातील नक्षलवाद्यांचे असते. या अनुषंगाने निवडणुकीपूर्वीच पोलीस महासंचालकांनी उपराजधानीतील नक्षलवाद विरोधी अभियानाच्या (एएनओ) सुराबर्डी येथील मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली. गडचिरोली व गोंदियातील संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी पोहोचवणे व त्यांना सुखरूप बाहेर काढण्याची आतापासून योजना आखण्यात यावी. यादरम्यान कुठल्या मार्गावर अधिक धोका असल्यास पर्यायी योजना तयार ठेवावी. लोकसभेप्रमाणे काही मतदान केंद्रांवर निवडणूक प्रतिनिधी पोहोचू न शकल्याने मतदान रद्द करणे, ही वेळ विधानसभेत यायला नको. नक्षलवाद्यांनी हल्ल्यांची योजना आखली असून आपल्या गुप्तचराच्या माध्यमातून त्यांची योजना हाणून पाडा. एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड राहिलेल्या ठिकाणी अधिक काळजी घ्या. जांभुळखेडा येथील घटनेचा प्रतिशोध घेण्याची हीच वेळ असून नक्षल्यांचा योजनापूर्वक बीमोड करा, अशा सूचना जयस्वाल यांनी दिल्या.

सीमा सील करा

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्य़ाला लागून असलेल्या छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून नक्षलवादी जंगलमार्गे इकडे तिकडे होतात. त्यामुळे सीमावर्ती भागातील छत्तीसगड व तेलंगणा पोलीस यांच्याशी समन्वय साधून अभियान राबवण्यात यावे व सीमा सील करण्यात याव्यात. यामुळे महाराष्ट्रात निवडणूक असताना छत्तीसगड व तेलंगणातून नक्षलवादी गडचिरोली व गोंदियात दाखल होणार नाहीत, असेही जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.