डॉ. आशीष देशमुख यांचा टोला

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नैतिक पराभव झाला आहे. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे आणि भरसभेत जाहीर केल्याप्रमाणे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपदी आरुढ होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी जोरदार टोलेबाजी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली.

देशमुख यांनी काँग्रेसकडून फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांना ५९ हजार ८९३ मते प्राप्त झाली, तर मुख्यमंत्र्यांना १ लाख ९ हजार २३७ मते मिळाली. त्यांना  ४९ हजार ४८२ हजारांचे मताधिक्य मिळाले. फडणवीस यांना २०१४ मध्ये ५८ हजार ९४२ मतांची आघाडी मिळाली होती.

याचाच अर्थ मतदारांनी त्यांना आमदार म्हणून स्वीकारले, पण मुख्यमंत्री म्हणून नाकारले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ऐनवेळी उमेदवारी कापण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत बावनकुळे यांना मंत्रिपदापेक्षा मोठे पद दिले जाईल, अशी घोषणा केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आशीष देशमुख यांनी करून मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाकडे लक्ष वेधले.

एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. देशमुख म्हणाले, अलीकडच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून एक चेहरा हवा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून समोर करून प्रचारात उतरले असते तर राकाँच्या जागा आणखी वाढल्या असत्या.

निवडणुकीदरम्यान जनतेपर्यंत जाण्यासाठी केवळ १३ दिवस मिळाले. तरीही लोकांनी भरभरून मतदान केले. त्यासाठी मतदारांचे आभार मानतो. विधानसभा निवडणुकीचे निकाल विरोधकांना आत्मविश्वास देणारे आणि सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणणारे आहेत. यापुढे जे प्रश्न सुटत नसतील, त्यासाठी लोकांनी आमच्याकडे यावे. आम्ही ते सोडवण्यासाठी सरकारला भाग पाडू, असे देशमुख म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही महिन्यांवर असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढणार आहे. दक्षिण नागपुरात काँग्रेसचे सध्या दोन नगरसेवक आहेत. ते वाढून १२ ते १५ करण्याचा विश्वास काँग्रेसचे दक्षिणमधील पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केला आहे.

पराभूत उमेदवारांचाही सत्कार

काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा सत्कार सोहळा येत्या ३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता अनसूया मंगल कार्यालय, जयताळा चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लढवय्या उमेदवारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं व अन्य पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.