महाराष्ट्र सरकार गप्प का?, माजी आ. चटपांचा सवाल
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्य़ातील तब्बल १४ गावांतील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून तेलंगणा सरकारने या सर्व गावकऱ्यांना आता जमिनीचे पट्टे वाटप करण्याच्या हालचाली सुरू केल्याने सीमावादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र सरकार गप्प का?, असा सवाल विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक माजी आमदार अ‍ॅड. वामन चटप यांनी केला. मेडिगड्डा-कालेश्वर धरणात हजारो जमीन बुडणार असल्याचे आधीच गडचिरोली जिल्ह्य़ातील गावकरी चिंताग्रस्त आहेत. आता तेलंगणा सरकारने चंद्रपूर जिल्ह्य़ातील १४ गावांचे सर्वेक्षण करून पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने सीमावाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. पण राज्यातील मंत्री, खासदार, आमदार त्यावर मूग गिळून बसले आहेत. या गावातील नागरिकांची नावे पूर्वी आंध्र आणि आता तेलंगणा मतदार यादीतून महाराष्ट्र सरकार वगळू शकले नाही. चंद्रपूरचे चार वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री असताना हंसराज अहीर यांनी देखील येथील नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप अ‍ॅड. चटप यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १७ डिसेंबर १९८९ रोजी ही गावे आंध्र प्रदेशाला दिली होती. आमदार झाल्यानंतर हा मुद्दा लावून धरला. तत्कालीन महसूल मंत्री विलासराव देशमुख यांनी हा प्रश्न मंत्रिमंडळात मांडून निर्णय मागे घेतला. आंध्रप्रदेश सरकार महाराष्ट्र सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर याचिका आंध्र प्रदेश सरकारने मागे घेतली. तेव्हापासून सीमेबाबत कोणताही वाद प्रलंबित नाही. या १४ गावांतील नागरिकांची नावे आदिलाबाद लोकसभा आणि खानापूर विधानभा मतदार यादीतून वगळून टाकण्याची मागणी केली. त्यासंदर्भात पंतप्रधानांसोबत बैठक बोलवण्याची विधानसभेत आश्वासन दिले गेले. परंतु गेल्या दहा वर्षांपासून बैठक आयोजित करण्यात आली नाही आणि मराठी भाषक नागरिकांची नावे तेलंगणाच्या मतदार यादीतून वळगण्यात आलेली नाहीत, असे चटप म्हणाले.
सीमेवरील गावे
चंद्रपूर जिल्ह्य़ातील तेलंगणा सीमेवरील परमडोली, कोटा, इंदिरानगर, अंतापूर, पद्मावती, शंकरलोधी, लेंडीगुडा, लेंडीजाळा, येसापूर (मेसापूर), भोलापठार, पळसगुडा, महाराजगुडा, कामतगुडा, तांडा (परमडोली) ही बारा गावे आणि दोन वाडय़ा अशा १४ गावांतील नागरिकांची नावे पूर्वी आंध्रप्रदेश आणि आता तेलंगणाच्या मतदारयादीत समाविष्ट आहेत.