नागपूर, काटोल, अमरावती, गडचिरोलीत व्यवसाय विस्तारासाठी जागा
बाबा रामदेव यांच्या पतंजली ट्रस्टवर महाराष्ट्र सरकार मेहरबान आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या विविध प्रक्रिया उद्योगांसाठी विदर्भातील नागपूर, काटोल, अमरावती आणि गडचिरोलीत सरकारने जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरमध्ये फूडपार्क उभारण्यासाठी ३४० हेक्टर, काटोलमध्ये संत्राप्रक्रिया प्रकल्पासाठी २०० एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. अमरावती व गडचिरोली येथेही त्यांना जागा दिली जाणार आहे. अमरावतीत फूडपार्क तर गडचिरोलीत जडीबुटींवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. पतंजली ट्रस्टचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण शुक्रवारी नागपूरमध्ये आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बाळकृष्ण यांनी चर्चा केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्यावर जागेबाबत अंतिम निर्णय झाला. त्यानंतर गडकरी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. गडचिरोलीत वनउपजावर आधारित औद्योगिक पार्क उभारण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून तेथे पतंजलीच्या जडीबुटी खरेदी केंद्राला जागा देण्यात येणार आहे, असे गडकरी म्हणाले. काटोलचा संत्रा प्रकल्प ५०० कोटींचा असून दीड महिन्यात यासाठी जागा देण्यात येणार आहे तर नागपूरच्या फूडपार्कमधील गुंतवणूक २००० हजार कोटींची असणार आहे.
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होत आहे, त्यासाठी पतंजलीने या भागात प्रक्रिया उद्योग सुरू करावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबा रामदेव यांना केली होती. या विनंतीवरून पतंजलीने या भागात उद्योग उभारणीचा निर्णय घेतला आहे, असे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले. विदर्भात गत दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आहे, मात्र आतापर्यंत कधीच रामदेवबाबांना शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची काळजी वाटली नाही. मात्र, आता सरकार बदलताच शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बाबांनी व्यवसाय विस्तारासाठी विदर्भ निवडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने आणि बाबांची या पक्षाशी जवळीक असल्याने सरकार त्यांच्यावर मेहरबान झाले आहे. पतंजलीला जागा देण्यासाठी जी तत्परता दाखविण्यात आली, त्याचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विशेष म्हणजे या तत्परतेचे बाळकृष्ण यांनीदेखील कौतुक केले आहे. पतंजलीने जागा मागावी व सरकारने द्यावी, असा सध्या प्रकार सुरू आहे.

आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, असा पतंजली ट्रस्टचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्वदेशी वस्तूला प्रोत्साहन देणे हे प्रमुख काम या ट्रस्टतर्फे केले जात आहे. आदिवासींकडून वनऔषधी खरेदी करणे व संत्रा प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणे या प्रकल्पांमळे शक्य होणार आहे. रामदेव बाबा आणि गडकरी यांचे घनिष्ठ संबंध असून त्यामुळेच बाबांनी नवीन प्रकल्पासाठी विदर्भाची निवड केली आहे.
– आचार्य बाळकृष्ण, पतंजली ट्रस्टचे प्रमुख.