सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील सर्व मद्यविक्री करणारी दुकाने बंद झाल्याने मद्यपींची गैरसोय झाली आहे. दुसरीकडे शासनाच्या महसुलावरही याचा परिणाम होणार असल्याने हे महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचे प्रयत्न शासकीय पातळीवरून सुरू झाले आहेत. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

महामार्गावर होणाऱ्या अपघातांसाठी मद्य कारणीभूत ठरत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि महामार्गावरील दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने सुरू केली. नागपुरातील ८७० हून अधिक दुकाने, बार आणि रेस्टॉरन्ट, बिअर शॉपींसह महामार्गावर असणाऱ्या तारांकित हॉटेलमधील दारुविक्रीही बंद करण्यात आली आहे. शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात तसेच शहरालगत राज्य महामार्गाचेही जाळे आहेच. त्यावरील दुकाने आणि बार हे न्यायालयाने घालून दिलेल्या अंतराच्या कक्षेत येत असल्याने ती शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बंद आहेत. सीताबर्डी, सदर, भंडारा रोड, वर्धारोड, अमरावती रोड, हिंगणा रोड, रिंगरोड, जबलपूरमार्ग इतरही ठिकाणी असलेली दुकाने आणि बार बंद होती. त्यामुळे मद्यपींची चांगलीच गैरसोय झाली. दरम्यान, मद्यविक्रीतून येणारा महसूल बुडत असल्याने राज्य शासनानेही यावर पर्याय शोधला असून शहरातून किंवा शहरालगत जाणारे राज्य किंवा महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या आदेशाचा आधार घेतला जात आहे. ज्या शहरात वळणमार्ग आहे अशा ठिकाणी शहरातून जाणाऱ्या महामागाचा टप्पा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करता येतो. याच आधारावर शहरातील महामार्ग महापालिकेकडे तर शहरालगतचे आणि त्या परिसरातील महामार्ग जिल्हा परिषदेकडे पुढच्या काळात हस्तांतरित केले जाऊ शकतात. असे झाल्यास या मार्गावर असणारे बार, मद्यविक्रीचा  परवाना असणारी हॉटेल्स आणि दुकानांना दिलासा मिळू शकतो. उत्पादन शुल्क खात्याने तसे संकेतही दिलेले आहेत.

रेल्वेत तीन महिलांना अटक

रेल्वेत मद्याची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी जी. टी. एक्सप्रेसच्या एस-१ डब्यातून रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास अटक केली. सुचिता जाट (३०), राजकुमारी जाट (३०), विद्या जाट (३६) अशी आरोपींची नावे आहेत. कमी श्रमात जास्त मोबदला मिळत असल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारल्याचे जवानांना सांगितले. त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात २०० बाटल्या मद्याच्या आढळल्या.

मद्यपींची पायपीट

प्रमुख भागातील तसेच नेहमीचे बार बंद असल्याने दोन दिवसांपासून मद्यपींची नवे ठिकाणे शोधण्यासाठी पायपीट सुरू आहे. शहरातील जुन्या भागातील बार सुरू आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या हद्दीच्या बाहेर असलेली दुकाने कोठे आहेत. याचा मद्यपींकडून शोध सुरू आहे. गोकूळपेठ, मेडिकल या भागातील दुकानांमध्ये आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. चोरटय़ा मार्गानेही जादा किमतीत काही ठिकाणी मद्यविक्री सुरू असल्याचेही आढळून आले.

बार कामगारांचा प्रश्न

न्यायालयाच्या निर्णयाने शहर व परिसरातील ५४३ बार बंद झाल्याने तेथे काम करणाऱ्या वेटर आणि इतर कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बार बंद करावा लागणार याची पूर्व कल्पना मालकांना होती व त्यांनी कामगारांनाही ती दिली होती. शेवटपर्यंत काही तोडगा निघेल असा त्यांना अंदाज होता. बिअर आणि वाईन शॉपीतील कामगारांच्या बाबतीतही हाच मुद्दा होता. या कामगारांनी आता नवीन रोजगार शोधणे सुरू केले आहे.