नागपूर : सध्या नागपूर मुक्कामी असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी  रेशीमबागमधील हेडगेवार स्मारक समिती परिसराला तसेच दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडक स्मारकाला भेट दिली.

राज्यपाल बुधवारपासून नागपुरात मुक्कामी आहेत. या काळात त्यांनी सेवाग्राम आश्रम, गोरेवाडा यासह इतरही काही भागांना भेटी दिल्या. सोमवारी सकाळी त्यांनी प्रथम संघभूमीवरील हेडगेवार स्मारक समिती परिसर गाठला. तेथील हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे व हेडगेवार स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री उपस्थित होते.

कोश्यारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून उत्तराखंडमध्ये काम केले. स्वयंसेवक म्हणून ते यापूर्वी नागपुरातील संघाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले आहेत. राज्यपाल म्हणून त्यांनी प्रथमच हेडगेवार स्मारक समिती परिसराला भेट दिली. काही काळ त्यांनी तेथे थांबून समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा  केली. राज्यपाल रेशीमबाग येथून थेट दीक्षाभूमीवर गेले. तेथे त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित  छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे उपस्थित होते.