लाखो रुग्णांना लाभ शक्य असल्याचा मार्डचा दावा

दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राज्य शासनाने अद्यावत आरोग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे या सगळ्याच संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अद्यावत वैद्यकीय सेवा मिळेल, असा दावा मार्डचे राज्य अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा आणि सचिव डॉ. आयुध मकदूम यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. सागर मुंदडा म्हणाले की, महाराष्ट्राच्या पंधराही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या निवासी डॉक्टरांना रुग्णांचे रक्त गोळा करण्यापासून त्याचा इतिहास तयार करा, ते संगणकावर अपलोड करण्यासह इतरही अनेक कामे करायला लावली जातात. त्याने या डॉक्टरांचा वेळ वैद्यकीय उपचाराचे शिक्षण घेण्याऐवजी अटेंडन्ट वा शिपायाची कामे करण्यात जातो. हा प्रकार योग्य नाही. दिल्लीत हा प्रकार टाळण्याकरिता चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन तेथील सरकारकडून करण्यात आले आहे. तेथे रुग्णांशी संबंधित सगळे प्रशासकीय कामे परिचारिकांना वाटल्या जातात. त्यामुळे परिचारिकांना त्यांच्या आठ तासांच्या सेवेत रुग्णसेवेसह ही कामेही दिली जातात. महाराष्ट्रात मात्र उलटेच चित्र आहे. येथे परिचारिकांची संख्या बऱ्यापैकी वाढल्यावरही त्यांच्याकडून ही कामे करून घेतली जात नाही. तेव्हा निवासी डॉक्टरांवर या कामांचा भार येतो. सोबत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली जाणारी बरीच कामेही निवासी डॉक्टरांकडून करवून घेतली जातात. हा प्रकार चुकीचा आहे. येथील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी दिल्लीत उपयोगात आणल्या जाणारे व्यवस्थापन येथेही वापरण्याची गरज आहे. यासह निवासी डॉक्टरांचे वारंवार शिक्षकांसोबत होणारे वाद टाळण्याकरिता एका त्रयस्त अधिकाऱ्याची प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करावी, निवासी डॉक्टरांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क कमी करावे, विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळवण्याकरिता मुंबई पुणे येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या भागात शेतकऱ्यांची छाननी करण्यासाठी सेवा देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला मेडिकलच्या मार्डचे डॉ. स्वर्णाक परमार उपस्थित होते.