महाराष्ट्र पोलिसांचे जनतेला आवाहन

अतिशय संवेदनशील अशा राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यात हायअलर्ट लागू केला आहे. निकाल कोणाच्याही बाजूने लागल्यानंतर अतिजल्लोष करून दुसऱ्यांच्या भावना दुखावण्याचे काम करू नये, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

अनेक वर्षांपासून अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या जागेचा वाद सुरू आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झालेली आहे. काही दिवसांत निकाल येणे अपेक्षित आहे. या निकालामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे निकाल देणारी यंत्रणा सर्वोच्च न्यायवस्था असून त्यावर लोकांचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे. निकाल काहीही असो, निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया, पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अथवा इतर समाज माध्यमांवर टाकू नये. टीकाटिपणी करणारी पत्रके प्रसिद्ध करू नये, जेणेकरून न्यायालयाचा अवमान ठरेल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांच्या हालचालींवर सायबर सेलकडूनही लक्ष ठेवण्यात येत असून  न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अशा सूचना आहेत

  • निकालानंतर जमाव करून थांबू नये.
  • सदर निकालाच्या अनुषंगाने कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशाप्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत.
  • निकालानंतर गुलाल उधळू नये.
  • फटाके वाजवू नयेत.
  • सायलेन्सर काढून वाहने पळवू  नयेत.
  • महाआरती किंवा समूह पठण यांचे आयोजन करू नये.
  • निकालानिमित्त पेढे, साखर अथवा मिठाई वाटू नये.
  • घोषणाबाजी, जल्लोष करू नये.
  • मिरवणूक रॅली काढू नये.
  • भाषणबाजी करू नये.
  • कोणतेही वाद्य वाजवू नये.
  • धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने शब्दप्रयोग करू नये.
  • जातीय दंगलीचे जुने व्हिडीओ,  फोटो पुन्हा प्रसारित करून समाजात अफवा पसरवू नये.

या कलमांतर्गत कारवाई

जातीय तणाव निर्माण केल्यास, धार्मिक भावना भडकवणे, अपशब्दांचा वापर करणे, धार्मिक भावना दुखावण्यासाठी संबंधित व्यक्तींवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात येईल. भादंविच्या २९५, २९५ (अ) आणि २९८ कलमान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.