• दहावीच्या निकालात राज्यात सर्वात मागे
  • विभागात गोंदियाची भरारी, वर्धा माघारला

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागाची ‘निकालपत’ घसरली असून हा विभाग राज्यात सर्वात मागे राहिला आहे. नागपूर विभागात एकूण १,७१,३६४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी १,७०,३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १,४६,४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वात कमी म्हणजे ८५.९७ टक्के इतकी आहे.

विदर्भातील अमरावती विभाग नागपूरच्या पुढे आहे. अमरावतीमध्ये १,७१,८११ विद्यार्थ्यांपैकी १,७०,८९९ प्रविष्ट झाले. त्यातील १,४७,८०९ उत्तीर्ण झाले. एकूण ८६.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकेकळी लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध पावलेला लातूर विभाग दहावीच्या निकालात फारशी कामगिरी करू शकलेला नाही. या विभागाचा निकाल ८६.३ टक्के लागला आहे, तर नागपूर विभागात ८५.९७ टक्के निकाल लागून सर्वात शेवटी आहे. याहीवर्षी पुन्हा विद्यार्थिनींनीच बाजी मारली असून नागपूर विभागात गोंदिया आघाडीवर वर वर्धा जिल्हा सर्वाधिक पिछाडीवर आहे. गेल्यावर्षी नियमित विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.६७ टक्के होती. ती २.३ टक्क्याने वाढून यावर्षी ८५.९७ टक्के झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नऊ विभागीय मंडळांचा निकाल आज शुक्रवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया या सहा जिल्ह्य़ांतील एकूण ६८२ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. भंडाऱ्यात १९,१२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९,०५४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. पैकी १६,५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८६.६४ टक्के आहे. चंद्रपुरात ३१,९७८ विद्यार्थी आहेत. त्यापैकी प्रविष्ट विद्यार्थी ३१,८०८ असून २७,०८४ (८५.१५टक्के), नागपुरात ६३,५१० नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी प्रविष्ट विद्यार्थी ६३,०७२ असून पैकी ५४,४२७ (८६.२९) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वर्धा जिल्ह्य़ात १७,८९१ विद्यार्थ्यांपैकी १४,८९३ उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी विभागात सर्वात कमी ८३.६४ टक्के एवढी आहे. गडचिरोली जिल्ह्य़ात १५,९७० पैकी १३,७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८५.८९ टक्के आहे, तर गोंदिया जिल्ह्य़ातील २२,६०३ प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी १९,७८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.५५ या जिल्ह्य़ाची आहे. एकूण २,६१७ शाळांची विभागात परीक्षा झाली असून परीक्षा केंद्रे ६८२ होती.

कॉपीचा टक्का घसरला

नागपूर विभागात परीक्षेदरम्यान ५२ कॉपी प्रकरणे समोर आली. भंडारा आणि वर्धा जिल्ह्य़ात प्रत्येकी एक, चंद्रपुरात आठ, गोंदियात चार, नागपुरात शून्य तर गडचिरोलीत तब्बल ३८ कॉपी प्रकरणे होती. परीक्षेतर काळात ४७ प्रकरणे होती. जी परीक्षकांनी विभागीय मंडळाकडे पाठवली. गेल्यावर्षी परीक्षा काळात कॉपीची ९६ प्रकरणे होती. त्या तुलनेत यावर्षी प्रमाण कमी असल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.

असा आहे नागपूर विभागाचा निकाल

नागपूर विभागात दहावीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८८,७७४ एवढी होती, तर विद्यार्थिनींची संख्या ८२,५९० होती. त्यापैकी ८२,२४६ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या. परीक्षेत ७२,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ७३,४५३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८२.८५ टक्के, तर विद्यार्थिनींची ८९.३१ टक्के आहे.

तब्बल २३,८९६ विद्यार्थी अनुत्तीर्ण

यावर्षी तब्बल २३,८९६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली मात्र, परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक हजारावर आहे. ही संख्या शाळाबाह्य़ मुलांपेक्षा मोठी असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. परीक्षेत १,७१,३६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १,७०,३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव १,०५० विद्यार्थी परीक्षेला बसूच शकले नाहीत. तसेच तब्बल २३,८९६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

ठळक वैशिष्टय़े

  • नागपूर विभागातील निकालाची टक्केवारी – ८५.९७ टक्के
  • गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात २.३ टक्क्याने वाढ
  • तीन तृतीयपंथीयांनी नोंदणी केली होती पण, त्यांनी परीक्षा दिलीच नाही
  • बारावीप्रमाणेच दहावीलाही सर्व विषयांसाठी बारकोडचाच वापर करण्यात आला
  • यावर्षीपासून निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय