नागपूर विभाग  ८३.६७ टक्के

नागपूर विभागाच्या दहावीच्या निकालाची टक्केवारी आणि नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण टक्केवारीत घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाची निकालाची टक्केवारी १.६७ तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ४.५ टक्क्यानेघटली आहे.

दहावीत भरभरून गुण दिले जातात, हा समज मागे टाकत नागपूर विभागाचा ८३.६७ टक्के निकाल जाहीर झाला असला तरी हा निकाल काही कमी नसल्याचा निर्वाळा नागपूर विभागाच्या सचिवांनी दिला आहे. ७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या दरम्यान झालेल्या दहावी परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. एकूण १,७५,६९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात ९९,१०५ मुलांचा तर ८८,५०३ मुलींचा समावेश होता. त्यापैकी १,७४,८०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ९८,४५१ मुले, ८८,१९९ मुली होत्या. एकूण १,४६,२५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ७५,९१८ मुलांचा (७७.११ टक्के) तर ७४,९६३ मुलींचा (८४.९९ टक्के) समावेश आहे. विभागाची टक्केवारी ८३.६७ टक्के असून ती सर्वात कमी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुली आघाडीवर आहेत. नागपूर विभागात शाळांची संख्या २,६०९ आहे. नागपूर जिल्ह्य़ातील शाळा ९३१ असून त्यातील उत्तीर्ण विद्यार्थी ५७,५२८ आहेत. नागपूर जिल्ह्य़ाची उत्तीर्णतेची टक्केवारी ८१.४ टक्के आहे. सर्वात जास्त निकाल गडचिरोली जिल्ह्य़ाचा ८४.४१ टक्के, तर सर्वात कमी वर्धेचा निकाल ७६.२० टक्के लागला आहे. भंडाऱ्याची उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.०८ टक्के, चंद्रपूरची ७९.१८ टक्के आणि गोंदिया जिल्ह्य़ाची टक्केवारी ८२.०१ टक्के आहे. अशी नागपूर विभागाची एकूण टक्केवारी ८०.८४ टक्के आहे.

अमरावती विभागाचा   ८४.३५ टक्के निकाल

अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात अमरावती विभागाने गेल्या वर्षीच्या निकालाची टक्केवारी कायम राखली असून अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ७४ हजार ४८ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १ लाख ४६ हजार ८०२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा देखील नेहमीप्रमाणे उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.०६ तर मुलांचे ८१.२४ टक्के आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ८४.९९ टक्के लागला होता. निकालाच्या टक्केवारीत ०.६४ टक्क्यांची घसरण झाली आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये अमरावती विभागाचे स्थान आठवे आहे.

अमरावती विभागात गेल्या वर्षीच्या निकालात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला होता. यंदा देखील बुलढाणा जिल्ह्य़ाने बाजी मारली आहे. बुलढाण्याचा निकाल ८८.४९ टक्के इतका आहे. त्याखालोखाल वाशीम ८७.३७ टक्के, अमरावती ८५.१५ टक्के, अकोला ८४.०२ टक्के, तर सर्वात कमी निकाल यवतमाळ जिल्ह्य़ाचा ७८.०३ टक्के लागला आहे.

गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय अजूनही विद्यार्थ्यांसाठी कठीण परीक्षा घेत असून गणित विषयात सर्वात कमी म्हणजे ८४.२४ टक्के, तर इंग्रजी विषयात (प्रथम भाषा- ९७.०६) आणि (द्वितीय भाषा- ८६ टक्के) टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. विभागातून १ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ३८२ विद्यार्थी हे ७५ टक्क्यांहून अधिक गूण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

तर काठावर म्हणजे ३५ ते ४४ टक्क्यांपर्यंत गुण मिळवणाऱ्यांची संख्या १२ हजार ५८ इतकी आहे. सर्वाधिक ५४ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ६० ते ७४ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. हे चांगले संकेत मानले जात आहेत.

शंभर टक्के निकाला असणाऱ्या विभागातील शाळांची संख्या २४२ आहे. विभागात एकूण २ हजार ५२३ शाळा आहेत. ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत ७४८ शाळा पोहचू शकल्या. चार शाळांना तर भोपळा देखील फोडता आलेला नाही. ४० टक्क्यांच्या आत निकाल लावणाऱ्या शाळांची संख्या ५९ आहे.

अमरावती विभागात कॉपीची ११६ प्रकरणे निदर्शनास आली, त्यात ११४ प्रकरणांमध्ये विद्यार्थी दोषी आढळून आले आहेत. परीक्षोत्तर काळात गैरप्रकार केलेल्या प्रकरणांची संख्या ५६ होती. त्यात ४३ प्रकरणे निर्दोष आढळून आली असून १३ प्रकरणांमध्ये निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

अमरावती विभागातून १२ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली होती. त्यापैकी ३९ टक्के म्हणजे ४९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात दहा विद्यार्थी हे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

कला गुणांना उत्तेजन

दहावीच्या मार्च २०१७ परीक्षेपासून शास्त्रीय कला, चित्रकला या क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंदा गुण देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजना यंदा देखील सुरू आहे. परीक्षेत कमाल दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी सुविधा लागू असून एटीकेटी सवलतीमुळे इयत्ता ११ वीमध्ये मिळणारा प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून अनुत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्येच घेण्यात येत आहे.

कॉपी बहाद्दरांवर कारवाई

नागपूर विभागात ८७ कॉपी बहाद्दर परीक्षा केंद्रावर पकडण्यात आले. त्यात भंडाऱ्यात १८, चंद्रपुरात ५, नागपुरात ८, वर्धेत २२, गडचिरोलीत २२ आणि गोंदियात ३२ कॉपी बहाद्दरांचा समावेश होता. चौकशीअंती त्यातील वर्धेचे तीन विद्यार्थी निर्दोष आढळले. त्यात शाई बदलणे, उत्तरपत्रिकेतील काही पाने फाडून टाकणे, पेपरवर नाव लिहिणे, परीक्षार्थीने सूचक स्वत:चे नाव किंवा फोन नंबर लिहिणे अशा परीक्षोत्तर काळातील गैरमार्गाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४७ आहे. पेपर सोडवताना परीक्षक, मॉडरेटरने मंडळाच्या निदर्शनास ही ४७ प्रकरणे आणून दिली. त्यापैकी सात विद्यार्थी दोषी आढळले, तर ३७ निर्दोष होते.

२६९ शाळांचा निकाल शतप्रतिशत

नागपूर विभागात १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या २६९ आहे. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील १३९, भंडाऱ्यात १९, चंद्रपूर २८, वर्धा १९, गडचिरोली ३५ आणि गोंदियात २९ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. नागपूर विभागात शून्य टक्के निकाल जाहीर झालेली एकच शाळा आहे. मात्र, ती नवीन शाळा असेल आणि विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्जच भरले नसतील, अशी शक्यता मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांनी व्यक्त केली.

शून्य टक्केची उत्सुकता संपली

काही वर्षांपूर्वी शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची नावे माहिती करून घेण्याची उत्सुकता असायची, पण हल्ली शून्य टक्के निकाल लागणाऱ्या शाळा शून्य आहेत. २० गुण असेसमेंटचे असतानाही काही शाळांचा निकाल ५० टक्के देखील लागलेला नाही, ही गंभीर बाब समोर आली आहे. एक ते १० टक्के निकाल लागलेल्या ३ शाळा आहेत. १० ते २० टक्के निकाल लागलेल्या ४ शाळा आहेत, तर २० ते ३० टक्के निकाल लागलेल्या १२ शाळा आहेत.

दहावी परीक्षेचा निकाल

नागपूर विभागाच्या निकालाची ठळक वैशिष्टय़े

* १०० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक

* शून्य टक्के निकाल लागलेली एक शाळा

* नागपूर विभागाचा ८३.६७ टक्के निकाल

* नागपूर जिल्ह्य़ाचा निकाल ८०.८४ टक्के

* निकालात मुलीच आघाडीवर