भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे. सामान्य माणसालादेखील पावसाची प्रतीक्षा असते. त्यामुळे हवामानखात्याकडून दिल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे सर्वाचे डोळे लागले असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत हवामानखात्याकडून दिले जाणारे मोसमी पावसाचे अंदाज बहुतांशी फसत चालल्याने खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. यावर्षी देखील पाऊस वेळेच्या आत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने केलेले भाकीत पूर्णपणे फसले आहे.

भारतासाठी आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी नैऋत्य मोसमी पाऊस अधिक महत्त्वाचा आहे. केरळमधून भारतात मान्सूनचा प्रवेश होतो.  यावर्षी हवामान खात्याकडून मोसमी पावसाचा अंदाज देण्याची झालेली घाई शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरणारी आहे. यावर्षी हवामान खात्याने मान्सून लवकर म्हणजेच वेळेच्या आत येणार म्हणून शेतकऱ्यांच्या मनात आशेचे बीज रोवले. अंदमानवरून केरळ आणि केरळवरून महाराष्ट्रात मान्सूनच्या अंदाजाची घाई, येथेच खात्याचे पहिले पाऊल चुकले. त्यात भरीस भर म्हणजे काही हवामानतज्ज्ञांनीसुद्धा खात्याच्या पावलावर पाऊल ठेवत तोच अंदाज दिला. दरम्यान, मान्सून वेळेच्या आत तर दाखल झालाच नाही, पण वेळेपेक्षा खूप उशिरा येणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. केरळमध्ये अडकून मान्सूनने चक्क हवामान खात्याला पाठ दाखवली. येथे शेतकऱ्यांना पहिला झटका बसला. केरळमधील मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून आहे, पण सामान्यपणे या तारखेच्या मागेपुढे मान्सून येतो. यावेळी मात्र जूनच्या मध्यान्हानंतरच त्याच्या आगमनाचे संकेत आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने मात्र राज्यात चांगलाच जोर धरला आहे आणि त्याचाच फायदा घेत हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन जाहीर करून टाकले. वास्तविकतेत हवामान खात्याच्या नकाशावर आणि मुंबईच्या रडारवरदेखील कुठेही मोसमी पावसाची वाऱ्याची दिशा प्रतिबिंबित नव्हती. याउलट १९ जूननंतर मान्सूनचे वारे या नकाशांमध्ये जोरकसपणे प्रतिबिंबित करण्यात आले आहे.

अंदाजावर ठाम

सर्वसामान्य लोकांना मान्सूनची ओळख माहीत नाही, जितकी हवामान खात्याला माहीत आहे. हवामान खात्याच्या मॉडेलमध्ये एकवेळ पाऊस किती पडणार, पडणार की नाही हे चित्र बदलेल, पण वाऱ्यांची दिशा आणि तापमानाबद्दल मॉडेल स्थिर असतात. मात्र, यावेळी मान्सूनचे वारे न तपासता दिला गेलेल्या अंदाजाने घोळ निर्माण झाला आहे. हवामान खाते मात्र आपल्या अंदाजावर ठाम असून सर्व उपविभागांचा डाटा पाहून मान्सून जाहीर करत असल्याचे सांगतात.

पावसावर अवलंबून

भारतीय शेती अजूनही मोसमी पावसावर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनला विलंब झाला की शेतीचे वेळापत्रकही बिघडते. मान्सूनच्या पावसाशी जुळवून घेणे हे विशेषकरून विदर्भातील शेतकऱ्यांना कधीच जमले नाही. प्रतिकूल हवामानाला निसर्गाचा कोप समजून हतबल होण्यापलीकडे आणि नंतर आत्महत्येचा मार्ग पत्करण्यापलीकडे शेतकरी काहीही करत नाही. मान्सूनची प्रक्रिया समजून घेऊन शेतीचे नियोजन आखले तर होणारे नुकसान बऱ्याच अंशी टाळता येईल, हेही तेवढेच खरे आहे.

अंदाज चुकल्यास चिंता

पावसाच्या अंदाजाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांवर परिणाम होतो. सकारात्मक संदेश आल्यानंतर शेतकरी विश्वास ठेवणार. मात्र, जेव्हा ही सकारात्मकता नकारात्मकतेत बदलते तेव्हा शेतकरी कोलमडतो. कारण मान्सूनच्या अंदाजावर पेरणीचे गणित अवलंबून असते. साधारणपणे मान्सूनच्या पावसानंतर शेतकरी पेरणी करतात, कारण संथ बरसणाऱ्या मान्सूनच्या पावसाने पेरणी केलेल्या बीजांना अंकुर फुटतात. मान्सूनपूर्व पाऊस कमी वेळात धो-धो बरसून गायब होत असल्याने पेरलेले बी वाहून जाते. यावर्षीही विदर्भातील अमरावती जिल्’ाातील काही भागात जवळजवळ ७० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. हवामान खात्याने मान्सून जाहीर केल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाला मान्सूनचा पाऊस समजून विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकली.

..असे ठरते गणित

कोणतेही दोन मोसमी पाऊस सर्व बाबतीत सारखे नसतात तर त्यात काही ना काही फरक असतो. त्या प्रत्येक वर्षीच्या मोसमी एक वेगळेपण, वैशिष्टय़ असते आणि त्यामुळे मान्सूनचे पूर्वानुमान करणे इतके सोपे नाही. मान्सूनच्या आगमनाचे अनेक निकष आहेत, पण प्रत्येक वेळी ते लागू पडतीलच असे नाही. मान्सूनचे वारे पश्चिमेकडून किंवा दक्षिण-पश्चिमेकडून येतात. मान्सूनचे ढग मध्यम उंचीचे आणि दूरवर पसरलेले असतात. मान्सूनचा पाऊस शांतपणे गडगडाट न करता सातत्य राखून संथपणे बरसत असतो. पावसाची ही रिमझिम एकदा सुरू झाली की मान्सूनचा पाऊस बरसला हे मान्सूनचे गणित आहे. तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नैऋत्य किंवा पश्चिम दिशेने वारे वाहू लागणे हा महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाचा दुसरा संकेत आहे. तर ढगांच्या गडगडाटासह, विजांच्या कडकडाटासह आणि कमी वेळेत अधिक पडणारा पाऊस हे मान्सूनपूर्व पावसाचे गणित आहे.